मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : केएलई हॉस्पिटलमध्ये फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन
बेळगाव : केएलई संस्था अनेक क्षेत्रात कार्यरत असून, संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या दूरदृष्टीतून संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्थेने सुरू केलेल्या फर्टिलिटी (प्रजनन) सेंटरची ख्याती जगभरात पोहोचावी. बेळगावच्या जलद विकासात केएलईचे मोठे योगदान असून बेळगावने जगाच्या नकाशावर एक वेगळा ठसा उमटविला आहे, असे मत महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. केएलई हॉस्पिटलने सुरू केलेल्या नूतन फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल दयानंद बी., काहेरचे उपकुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, जेएनएमसीचे प्रा. डॉ. एन. एस. महांतशेट्टी, डॉ. विजयकुमार एस., डॉ. सुरभी अरोरा, डॉ. जयश्री रोगे होते.
एकाच छताखाली सर्व सुविधा
हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, जर बेळगावमध्ये केएलई हॉस्पिटल नसते तर या भागात खूप वैद्यकीय अराजकता निर्माण झाली असती. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला शेजारच्या शहरात किंवा बेंगळूरमध्ये जावे लागले असते. पण डॉ. प्रभाकर कोरे यांनी हे ओळखून एक मोठे हॉस्पिटल निर्माण करण्याऐवजी एकाच छताखाली सर्व सुविधा प्रदान करत या भागातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करत आहेत, असेही त्या म्हणाल्या. डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असलेल्या केएलई हॉस्पिटलसाठी फर्टिलिटी सेंटर हे एक मैलाचा दगड आहे. अलिकडच्या काळात फर्टिलिटी दर कमी झाल्यामुळे या सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रात 5500 पेक्षा बेड्सची क्षमता असलेले हॉस्पिटल निर्माण केले आहे. हुबळीमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल सार्वजनिकांच्या सेवेसाठी समर्पित केले जात आहे. बेंगळूरमध्ये 7 एकर जागेत 200 बेड्सचे हॉस्पिटल बांधले जात आहे.
90 वर्षे जुन्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचे आधुनिकीकरण
90 वर्षे जुन्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचे आधुनिकीकरण करण्यात आले असून देश-विदेशातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. चिकोडीत आयुर्वेदिक तर बसवण कुडचीत होमिओपॅथी महाविद्यालय सुरू केले जात आहे. महाराष्ट्र सरकारने केएलई शिक्षण संस्था उघडण्यासाठी खूप मदत केली आहे. मुंबईतील फार्म बिचवर शाळा बांधली जात आहे. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी 10 एकर जमीन देण्यात आली असून, सर्वकाही सामाजिक बांधिलकीने केले जात आहे. जर केएलईला बिम्स हॉस्पिटल चालविण्याची दिले तर आम्ही सर्वोत्तम सेवा प्रदान करू, असेही ते म्हणाले. डॉ. वानिश्री यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नंदेश्वर पाटील यांनी प्रास्ताविक तर डॉ. अभिलाष ईश्वर यांनी आभार मानले.









