बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयोजित बेळगाव जिल्हा आंतर शालेय महापौर चषक मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेट झेव्हियर्सने हेरवाडकरचा तर मुलींच्या सामन्यात सेट झेव्हियर्सने सेंट जोसेफ कॉन्व्हेंटचा तसेच कॉलेज गटात केएलई इंजिनियरींगने लिंगराजचा 2-0 असा पराभव करुन महापौर चषक पटकाविला. टिळकवाडीतील सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने सेंट झेवियर्स स्कूल संघाने एम.व्ही. हेरवाडकर स्कूल संघावर 2-0 असा एकतर्फी पराभव केला. सेंट झेवियर्स संघातर्फे ईशान घाटगे व अर्जुन सानिकोप यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविले. मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलवर टायब्रेकरमध्ये 5-4 असा विजय प्राप्त केला. सेंट झेवियर्स संघातर्फे साक्षी चटगी, श्रावणी सुतार, मारिया मुजावर, श्रद्धा पाटील, प्रांजल हजेरी तर सेंट जोसेफ स्कूलतर्फे सालबिया गोम्स, गौतमी जाधव, लक्ष्मी चन्नावर, सारा सौदागर यांनी गोल केले.
कॉलेज गटात झालेल्या अंतिम सामन्यात केएलई इंजिनिअरींग संघाने लिंगराज संघाचा 2-0 असा पराभव केला. केएलईतर्फे राधेश पाटील आणि ऋषिकेश बावडेकरने प्रत्येकी 1 गोल केला. सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, लेस्टर डिसोजा, कॅप्टन उत्तम शिंदे यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना चषक देवून गौरवण्यात आले. मुलींमध्ये उत्कृष्ट खेळाडू गौतमी जाधव-सेंट जोसेफ, उत्कृष्ट गोलरक्षक प्रणिता-झेवियर्स, शिस्तबद्ध संघ-सेंट जोसेफ-संतीबस्तवाड, मुलांच्या गटात उत्कृष्ट खेळाडू झियान-झेवियर्स, उत्कृष्ट गोलरक्षक लक्ष्य खतायत-हेरवाडकर, उत्कृष्ट संघ-एमव्हीएम, कॉलेज गटात उत्कृष्ट खेळाडू राधेश पाटील-केएलई, उत्कृष्ट गोलरक्षक सोहम ओऊळकर-लिंगराज, उत्कृष्ट संघ-जीआयटी यांना चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून विजय रेडेकर, कौशिक पाटील, अखिलेश अष्टेकर, यश सुतार, शुभम यादव, ओमकार कुंडेकर, विवेक सनदी, कृष्णा सनदी, रोहीत हिरेमठ यांनी काम पाहिले.









