डॉ. कर्नल बी. दयानंद यांची माहिती : सर्व विभाग होणार कागदविरहित : सर्व हॉस्पिटल्समध्ये राबविणार उपक्रम
बेळगाव : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर राहणाऱ्या केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलने पर्यावरणाचा विचार करून पूर्णत: पेपरलेस (कागदविरहित) प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णत: पेपरलेस होणारे हे कर्नाटकातील पहिले हॉस्पिटल ठरणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद यांनी दिली. हॉस्पिटलच्या सभा भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दयानंद म्हणाले, केएलई इन्स्टिट्यूचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात नेहमीच एक पाऊल पुढे राहिले आहे. आता पर्यावरणाचे संरक्षण करण्यात मोठी भूमिका बजावण्यास सज्ज आहे. केएलई हॉस्पिटल पूर्णपणे पेपरलेस झाले आहे. प्रभावी, कार्यक्षम व पर्यावरणपूरक डिजिटल सेवा पुरविण्यात अग्रेसर होणार असून सॉफ्टवेअरवरून रुग्णाची संपूर्ण उपचाराची डिजिटल माहिती उपलब्ध होणार आहे. केएलई हॉस्पिटल हे कर्नाटकातील पहिले पूर्णपणे पेपरलेस हॉस्पिटल ठरले असून रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, केंद्र सरकारच्या पुढाकाराने रुग्णसेवा डिजिटल स्वरुपात प्रदान करण्याचा मानस आहे. एबीएआरके योजनेमध्ये डिजिटल माहिती ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. केएलईमार्फत डिजिटल सेवा पुरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील प्रेस्को कंपनीच्या सहकार्याने हॉस्पिटलमधील सर्व विभागांमध्ये डिजिटल सेवा प्रदान करण्यात येणार आहे. रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंतची सर्व माहिती टॅबच्या माध्यमातून सॉफ्टवेअर अपलोड होणार आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हॉस्पिटलकडून रुग्णांची सर्व उपचाराची माहिती अपलोड होणार आहे. मात्र डिजिटल सेवा पुरविताना याचा गैरवापर होऊ नये व रुग्णांची माहिती राहावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक रुग्णाला डिजिटल क्रमांक देण्यात येणार आहे. याद्वारे रुग्णाची संपूर्ण माहिती त्या क्रमांकामध्ये सुरक्षित राहणार आहे. पेपरलेस सुविधा देण्याअगोदर चार महिन्यांपासून सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
1200 बेड्सचे केएलई हे कर्नाटकातील पहिले पेपरलेस हॉस्पिटल बनले आहे. कागदविरहित आरोग्यसेवा प्रदान करणे कठीण असले तरी डॉ. प्रभाकर कोरे व अमित कोरे यांच्या दूरदृष्टीने हे शक्य झाले आहे. हॉस्पिटलचा कागदपत्रांमधील वेळ लक्षणीयरित्या कमी होणार असून जलद रुग्णसेवा प्रदान करण्यात येणार आहे. प्रामुख्याने आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय डिजिटल आरोग्यप्रणाली डेटा गोपनीय आणि सायबर क्राईमची सर्वोच्च मानके स्वीकारूनच पेपरलेस सुविधा प्रदान करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. येणाऱ्या काळात केएलई आपल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये पेपरलेस आरोग्यसेवा उपक्रमाचा विस्तार करण्याची योजना आहे. यामुळे केएलई सर्व हॉस्पिटल्समध्ये पेपरलेस आरोग्य सुविधा पुरविणारी भारतातील पहिली संस्था बनणार आहे. दरवर्षी 50 हजारहून अधिक रुग्ण नोंदी हाताळणारे हे हॉस्पिटल पेपरलेस झाले आहे. यामुळे 10 ते 12.5 दशलक्ष पानांचे कागद वाचणार असून अंदाजे 1500 झाडांचे संरक्षण होणार आहे, असेही दयानंद म्हणाले. यावेळी प्रेस्कोचे सीईओ विक्रम धोत्रे, डॉ. माधव प्रभू यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.









