450 हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग : औषध-निर्मितीवर माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
अमेरिकन असोसिएशन ऑफ इंडियन फार्मास्युटिकल्स सायंटिस्ट (एएआयपीएस) च्या सहकार्याने तसेच नॅशनल रिसर्च फाऊंडेशन यांच्यातर्फे केएलई कॉलेज ऑफ फार्मसी येथे शुक्रवार दि. 20 व शनिवार दि. 21 रोजी केएलई इंटरनॅशन फार्म डी कोलोक्वियम-2024 चे आयोजन करण्यात आले होते. फार्मसी क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण, नाविन्यता याला गती देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवंतांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. माँटेज लॅबोरेटरी, अहमदाबादचे प्रमुख डॉ. श्रेणिक शहा यांच्या हस्ते गुरुवारी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एएआयपीएसचे संस्थापक आणि सदस्य मुकुंद एल्लीगी होते. संचालक डॉ. सुवर्णा रॉय उपस्थित होते. केएलई विद्यापीठातर्फे डॉ. नितीन गंगाणे, डॉ. एम. एस. गणाचारी, डॉ. सुनील जलालपुरे, डॉ. व्ही. एस. मास्तीहोळीमठ, डॉ. व्ही. एस. मण्णूर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. जलालपुरे यांनी स्वागत केले. डॉ. गणाचारी यांनी केएलई इंटरनॅशनल फार्म डी कोलोक्वियमचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे डॉ. शहा यांनी आरोग्यसेवेसाठी आवश्यक असणारे घटक, स्वयंशिस्त, आजार आणि आरोग्य यावर माहिती दिली. आरोग्य क्षेत्रात फार्मास्युटिकल्सचे महत्त्व वर्तमान व भविष्यात कायमच राहणार असल्याचे व औषधांचा जागतिक स्तरावरील दर्जा टिकवून ठेवणे यावर माहिती दिली.
24 संस्थांमधील 450 हून अधिक प्रतिनिधींनी कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, पथनाट्या, लघुपट बनविणे, मन की बात यासारखे उपक्रमही झाले.









