करारावर एस. सेल्वकुमार-डॉ. प्रभाकर कोरे यांची स्वाक्षरी
बेळगाव : राजधानी बेंगळूरमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जीम-2025 या औद्योगिक क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय मेळाव्यात केएलई संस्थेने महत्त्वपूर्ण करार केला आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात अत्यावश्यक असणाऱ्या शिक्षण, संशोधनाशी संबंधित क्वीन सिटीमध्ये पुढील पाच वर्षांसाठी 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा करार केएलई संस्थेने केला आहे. उद्योग खात्याचे मुख्य सचिव एस. सेल्वकुमार व केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या गुंतवणुकीच्या करारामुळे अनेक नव्या उद्योगांची निर्मिती होणार असून ही गुंतवणूक क्वीन सिटी अर्थात बेंगळूरला पहिलीच आहे. त्याचबरोबर सौंदत्ती येथील शिवशक्ती शुगर्स व इनामदार शुगर्स हे कारखाने साखर आणि इथेनॉल उत्पादनासाठी पुढील दोन वर्षांसाठी अनुक्रमे 1 हजार कोटी व 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. कराराप्रसंगी उद्योगमंत्री एम. बी. पाटील, आमदार महांतेश कौजलगी, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, राज्यपाल थावरचंद गेहलोत, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आदी उपस्थित होते.









