उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक बेड्सच्या हॉस्पिटलपैकी पहिले : संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा
बेळगाव : शहरातील केएलई येथील डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटरला प्रतिष्ठित एनएबीएच (नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स) ची पूर्ण दर्जाची मान्यता मिळाली आहे. एनएबीएच ही संस्था भारतातील आरोग्य सुविधांची गुणवत्ता मान्यता देते किंवा निश्चित करते. केएलई हे एनएबीएच मान्यता प्राप्त करणारे सर्वाधिक बेड्सच्या हॉस्पिटलपैकी पहिले हॉस्पिटल बनले आहे, ज्यामुळे आरोग्य क्षेत्रातील एनएबीएच मान्यताप्राप्त केएलई हॉस्पिटल म्हणून मान मिळाला. यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद यांनी कौतुक केले. केएलई हे उत्तर कर्नाटकात पहिले सर्वाधिक बेड्सचे विशेष हॉस्पिटल आहे, ज्याला दर्जेदार मान्यता मिळाली आहे.
मान्यता प्रक्रियेमध्ये रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रण, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवांची क्षमता यासह विविध पैलूंचे परीक्षण करणारी व्यापक मूल्यांकन प्रक्रिया समाविष्ट आहे. एनएबीएच पथकाने हॉस्पिटलमधील सर्व विभागांची तपासणी केल्यानंतर हॉस्पिटलने राबविलेल्या व्यापक मूल्यांकनाचे कौतुक करून पूर्ण दर्जाची एनएबीएच मान्यता दिली. हॉस्पिटलला पूर्ण एनएबीएच मान्यता मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक व सर्वोत्तम दर्जाची रुग्णसेवा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून 120 हून अधिक धोरणात्मक विधाने करण्यात आली आहेत. एनएबीएच मान्यता मिळविण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल्स यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद यांनी सांगितले.
एनएबीएच म्हणजे काय?
एनएबीएच म्हणजे नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅण्ड हेल्थकेअर प्रोव्हाडर्स होय. एनएबीएचची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली. ही हॉस्पिटल व आरोग्यसेवा पुरवठादारांसाठी मान्यता देणारी राष्ट्रीय संस्था आहे. आरोग्याशी संबंधित संस्था किंवा हॉस्पिटलची स्थापना आणि संचलन करण्यासाठी ही एक प्रशासकीय संस्था आहे. भारतीय संविधानानुसार एनएबीएच ही भारतीय गुणवत्ता परिषदेच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून काम करते. एनएबीएच ही देशातील आरोग्य व आरोग्यसेवांवर देखरेख ठेवणारी सर्वोच्च पातळीची संस्था आहे.









