बेळगाव : केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च विद्यापीठाचा (केएलई डिम्ड युनिव्हर्सिटी) दीक्षांत समारंभ दि. 3 जून रोजी सकाळी 9.30 वाजता केएलई शताब्दी सभागृहात होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुटुंब कल्याण, रसायने व खते खात्याचे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व नागरी पुरवठा खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तर अध्यक्ष म्हणून काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी सकाळी जेएनएमसीच्या कार्यालयात बोलावलेल्या या परिषदेत ते म्हणाले, या दीक्षांत समारंभात एकूण 1844 पदवी प्रदान केल्या जातील. त्यामध्ये 40 जणांना पीएचडी, 29 जणांना पोस्ट डॉक्टरल (डीएमएमसीएच), 660 पीजी, 680 युजी, 9 पीजी डिप्लोमा, 11 डिप्लोमा, 4 फेलोशिप्स व 11 सर्टिफिकेट कोर्स यांचा समावेश आहे. 35 जणांना सुवर्णपदक देण्यात येणार असून विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यामध्ये 28 मुली आहेत. केएलई बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉ. श्वेता राजशेखर गोरे या अक्कलकोटच्या विद्यार्थिनीने सर्वाधिक म्हणजे चार सुवर्णपदके मिळविली आहेत.
जेएनएमसीच्या डॉ. करुमुदी प्रत्युषा हिने पीजी स्तरावर 3 सुवर्णपदके मिळविली आहेत. यावर्षी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे प्राध्यापक व कॅन्सर सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली जाणार आहे. कर्करोग क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. लिव्हर कॅन्सरमध्ये त्यांचा विशेष अभ्यास असून कॅन्सर केअर सेंटर सुरू करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. जागतिक स्तरावर त्यांनी 600 हून अधिक व्याख्याने दिली आहेत, अशी माहिती कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मुली अत्यंत चमकदार कामगिरी करत आहेत, असे सांगून त्यांनी श्वेता व प्रत्युषा यांचे विशेष अभिनंदन केले.
वैद्यकीय क्षेत्राकडे वाढणारा ओढा लक्षात घेऊन आणखी काही कॉलेज सुरू करणार का? नर्सिंग कॉलेजची गरज भासते का? या प्रश्नांवर डॉ. कोरे म्हणाले, आज जेथे तेथे नर्सिंग कॉलेज सुरू होत आहेत, परंतु नर्सना जे ‘बेडसाईड ट्रेनिंग’ दिले पाहिजे, ते मिळते आहे का? याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिकाशिवाय वैद्यकीय शिक्षण पूर्ण होत नाही. त्यामुळे जरी कॉलेजची संख्या वाढत गेली तरी जेथे दर्जेदार शिक्षण मिळते आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळते, त्यांचेच अस्तित्व अबाधित राहील. अलीकडे वाढलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण पाहता केएलईतर्फे पोलीस, रिक्षाचालक यांना त्वरित उपचार करण्याचे प्रशिक्षण आम्ही देत आहोत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला झटका आला तरी हॉस्पिटलला येईपर्यंत त्याच्यावर प्राथमिक उपचार होऊ शकतील, अशी माहितीसुद्धा डॉ. कोरे यांनी दिली. यावेळी कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी, चंद्रकला मेटगुड, डॉ. तेजश्री प्रधान आदी उपस्थित होते.









