वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल उर्वरित आयपीएलमध्ये सहभागी न होण्याची जास्त शक्यता आहे. आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यावेळी त्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आहे.

त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटही आयपीएलमध्ये खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरावावेळी त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याने तो खेळणार नसल्याचे सांगण्यात आले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडूंचा समावेश असल्याने भारतीय संघाची मेडिकल टीम या दोघांना विशेषत: फलंदाज-यष्टिरक्षक राहुलला लवकरात लवकर फिट करण्यासाठी प्रयत्नशील असेल. लंडनमध्ये 7 जूनपासून ही लढत होणार आहे. ‘राहुल सध्या संघासमवेत लखनौमध्ये आहे. पण तो गुरुवारी पुढील तपासणीसाठी जाणार आहे. त्याचे मुंबईमध्ये बीसीसीआयने निश्चित केलेल्या मेडिकल सेंटरमध्ये स्कॅनिंग केले जाईल. त्याची व उनादकटची केस बीसीसीआय हाताळत आहे,’ असे बीसीसीआयमधील एका सूत्राने सांगितले. मात्र आतापर्यंत दोघांचेही स्कॅन करण्यात आले नसल्याचेही या सूत्राने सांगितले.
‘अशा प्रकारची दुखापत झाली की त्याभोवती सूज येते आणि वेदनाही होत असतात. सूज कमी होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात, त्यानंतरच स्कॅन करता येणे शक्य होते. राहुल कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य असल्याने त्याला आयपीएलमधील उर्वरित भागात सहभागी होऊ दिले जाणार नाही. तो डब्ल्यूटीसी अंतिम लढतीपर्यंत फिट होईल का, हे निश्चितपणे आताच सांगता येणार नाही,’ असेही या सूत्राने स्पष्ट केले.









