दिल्लीचा 106 धावांनी पराभव : सामनावीर सुनील नरेन, रघुवंशी, रसेल, रिंकूची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ विशाखापटणम
सलामीस आलेला पिंच हिटर सुनील नरेनने षटकारांची आतषबाजी करीत नोंदवलेले अर्धशतक, त्याला अंगक्रिश रघुवंशीकडून मिळालेली अर्धशतकी साथ. रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या टप्प्यात केलेली तुफान फटकेबाजी यांच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 7 बाद 272 धावांचा डोंगर उभारला. या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 166 धावांवर आटोपला. या विजयासह केकेआरने सलग तिसरा सामना जिंकत गुणातालिकेत अव्वल स्थान काबीज केले. दिल्लीचा हा चार सामन्यातील तिसरा पराभव आहे.
केकेआरने विजयासाठी दिलेल्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. ज्यातून त्यांना शेवटपर्यंत सावरता आले नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 18 व पृथ्वी शॉ 10 धावा काढून स्वस्तात बाद झाले. यानंतर मिचेल मार्श व अभिषेक पोरेलही बाद झाल्याने दिल्लीचा संघ अडचणीत सापडला होता. यावेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत व ट्रिस्टन स्टब्जने 93 धावांची भागीदारी साकारली. पंतने अवघ्या 25 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह 55 धावा केल्या तर स्टब्जने 4 चौकार व 4 षटकारासह 54 धावांचे योगदान दिले. हे दोघे बाद झाल्यानंतर इतर दिल्लीच्या फलंदाजांनी निराशा केली व त्यांना 106 धावांनी हार पत्करावी लागली.
नरेन, रघुवंशीच् तुफानी फटकेबाजी
जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर केकेआरच्या सुनील नरेनने मागील सामन्यातील जोम कायम ठेवत दिल्लीच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 39 चेंडूंच्या खेळीत 7 षटकारांचा आणि त्यासोबत 7 चौकारांचा पाऊस पाडत 85 धावा झोडपल्या. 53 धावांवर असताना त्याला एक जीवदान मिळाले आणि सुनीलने त्याची किंमत त्यांना मोजावयास भाग पाडत टी-20 क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. आरसीबीविरुद्ध पहिल्या सामन्यात फलंदाजी करण्यास संधी न मिळालेल्या अंगक्रिश रघुवंशीनेही सुनील नरेनला उत्तम साथ देत 27 चेंडूत 54 धावा फटकावताना 5 चौकार, 3 षटकार मारले. या दोघांनी चौफेर टोलेबाजी करीत केवळ 48 चेंडूत 104 धावांची भागीदारी केली.
आंद्रे रसेल व रिंकू सिंग यांनी अखेरच्या टप्प्यात आतषबाजी कमी होणार नाही, याची दक्षता घेतली. रसेलने 19 चेंडूत 4 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 41 तर रिंकू सिंगने फक्त 8 चेंडूत 3 षटकार, 1 चौकार ठोकत 26 धावा फटकावल्या. दिल्लीच्या गोलंदाजांसाठी हा सामना दु:स्वप्नच ठरला. त्यांनी आजवरच्या सर्वोच्च धावा प्रतिस्पर्ध्याला दिल्या. त्यांच्याविरुद्ध 18 षटकार व 28 चौकार ठोकले गेले.
सुनील नरेनने खलील अहमदला डीप पॉईंटच्या दिशेने चौकार ठोकत सुरुवात केली. नंतर त्याने अनुभवी इशांत शर्माला हल्ला चढविला. त्याने टाकलेल्या डावातील चौथ्या षटकात तब्बल 26 धावा तडकावताना 3 षटकार, 2 चौकार हाणले. दुसऱ्या बाजूने फिल सॉल्टला वॉर्नरकडून जीवदान मिळाले. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने 12 चेंडूत 18 धावा जमविताना 4 चौकार मारले. आयपीएलमधील पहिल्याच चेंडूवर 18 वर्षीय रघुवंशीने चौकार ठोकत सुरुवात केली. पुढच्या चेंडूवरही त्याने चौकार मारला. केकेआरने चौकारांचा रतीब पुढे चालू ठेवत पॉवरप्लेमध्ये 88 धावा जमविल्या. सुनील नरेन व रघुवंशी यांना लागोपाठच्या षटकात बाद केल्यानंतर दिल्लीचे गोलंदाज नियंत्रण मिळवतील असे वाटले होते. पण रसेलने त्यांचे मनसुबे धुळीस मिळविले. दिल्लीच्या गोलंदाजांनीही त्याला अनेक फुलटॉसेस देऊन त्याचे काम सोपे केले. कर्णधार श्रेयस अय्यर 11 चेंडूत 18 धावा काढून बाद झाला. वेंकटेश अय्यर 5 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक : केकेआर 20 षटकांत 7 बाद 272 : सॉल्ट 12 चेंडूत 18, सुनील नरेन 39 चेंडूत 7 चौकार, 7 षटकारांसह 85, रघुवंशी 27 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह 54, रसेल 19 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 41, श्रेयस अय्यर 18, रिंकू सिंग 8 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 26, वेंकटेश अय्यर नाबाद 5, रमनदीप सिंग 2, स्टार्क नाबाद 1, अवांतर 22. नॉर्त्जे 3-59, इशांत 2-43, खलील अहमद 1-43, मार्श 1-37.
दिल्ली कॅपिटल्स 17.2 षटकांत सर्वबाद 166 (ऋषभ पंत 55, स्टब्ज 54, डेव्हिड वॉर्नर 18, पृथ्वी शॉ 10, वरुण चक्रवर्ती व वैभव अरोरा प्रत्येकी तीन बळी, मिचेल स्टार्क 2 बळी).