सामनावीर डी कॉकच्या नाबाद 97 धावा : राजस्थानचा सलग दुसरा पराभव
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली अखेर केकेआरला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय साकारता आला. क्विंटन डी कॉकच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर केकेआरने राजस्थान रॉयल्सवर आठ गड्यांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला 151 धावा करता आल्या. यानंतर डी कॉकच्या वादळी खेळीच्या जोरावर यावेळी केकेआरने 17.3 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यातच विजयी लक्ष्य पूर्ण केले. डी कॉकने यावेळी नाबाद 97 धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. संजू सॅमसनच्या राजस्थानला मात्र सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
राजस्थानच्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डी कॉकने केकेआरचा विजय सुकर केला. कारण डी कॉकने सुरुवातीपासून जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली आणि केकेआरला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. डी कॉकने 61 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 97 धावांची नाबाद खेळी खेळली, त्याचे शतक हुकले पण डी कॉकची खेळी खूप खास ठरली. कारण गुवाहाटीची खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती आणि तो शेवटपर्यंत क्रीझवर राहत केकेआरला मोसमातील पहिला विजय मिळवून माघारी परतला.
गुवाहाटीच्या खेळपट्टीवर फलंदाजी सोपी नव्हती आणि हे जाणून घेत पॉवरप्लेमध्ये कोलकाताने संथ सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये केकेआरला फक्त 40 धावा करता आल्या, संघाने 7.4 षटकांत 50 धावांचा टप्पा गाठला. मोईन अली (5) आणि अजिंक्य रहाणे (18) सहज फलंदाजी करू शकले नाहीत. पण डी कॉकने प्रभावी खेळी केली. त्याने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर अंगक्रिश रघुवंशीसह 30 चेंडूत 50 धावांची भागीदारी करत केकेआरचा विजय निश्चित केला.
राजस्थानचा सलग दुसरा पराभव
कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रहाणेने या मॅचमध्ये सुनील नरेनऐवजी मोईन अलीला संधी दिली. मोईन अलीने हा विश्वास सार्थ ठरवताना यशस्वी जैस्वाल आणि नितीश राणा या दोघांना बाद केले. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल व संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्या चार षटकांत त्यांनी 33 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार रियान परागने 15 चेंडूत 3 षटकारासह 25 धावांचे योगदान दिले. 8 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रियान परागला वरुण चक्रवर्तीने बाद केले आणि राजस्थानच्या फलंदाजीचा किल्ला ढासळण्यास सुरुवात झाली.
रियान पराग बाद झाल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये यशस्वी जैस्वाल हा मोईन अलीला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये वानिंदू हसरंगा वरुण चक्रवर्तीपुढे टिकाव धरु शकला नाही. नितीश राणा 8 धावा करुन बाद झाला. यावेळी राजस्थानची 5 बाद 82 अशी स्थिती होती. यादरम्यान ध्रुव जुरेलने 28 चेंडूत 5 चौकारासह 33 धावांची खेळी करत संघाला दीडशेचा टप्पा पार करुन दिला. हेटमेयर 7 धावा करुन तंबूत परतला तर आर्चरने शेवटच्या षटकात दोन षटकारासह 16 धावा फटकावल्या. केकेआरच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. वरुण चक्रवर्ती, मोईन अली, हर्षित राणा, वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 9 बाद 151 (यशस्वी जैस्वाल 29, संजू सॅमसन 13, रियान पराग 25, ध्रुव जुरेल 33, जोफ्रा आर्चर 16, वैभव अरोरा, हर्षित राणा, मोईन अली व वरुण चक्रवर्ती प्रत्येकी दोन बळी)
केकेआर 17.3 षटकांत 2 बाद 153 (मोईन अली 5, डी कॉक नाबाद 97, अजिंक्य रहाणे 18, रघुवंशी नाबाद 22, हसरंगा एक बळी).









