वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई इंडियन्स आज रविवारी कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार असून कोलकात्याच्या आक्रमक फलंदाजांचे आव्हान पेलणे त्यांना सोपे जाणार नाही. दोन्ही माजी विजेते त्यांची स्पधेंतील वाटचाल पुन्हा रुळावर आणण्याच्या तयारीत आहेत. मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागील सामन्यात विजयाचा शोध पूर्ण करण्यात यश आले, तर कोलकाता नाईट रायडर्सनी जोरदार झुंज देऊनही शुक्रवारी रात्री सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ईडन गार्डन्सवर झालेल्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला.
तथापि, मागील सामना जिंकूनही ‘आयपीएल’मधील सर्वांत यशस्वी मुंबई इंडियन्स संघ वानखेडे स्टेडियमवर अतिरिक्त दबावाखाली असेल, कारण ते आतापर्यंत त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकलेले नाहीत. दोन विजय आणि तितक्याच पराभवांनिशी केकआर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे आणि मुंबई इंडियन्सच्या तुलनेत त्यांची धावांची सरासरी 0.711 इतकी म्हणजे चांगली आहे. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत दोन गुणांसह नवव्या स्थानावर आहे आणि त्यांची धावांची सरासरी उणे 0.879 इतकी आहे.
रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना जिंकून देणारी 65 धावांची खेळी केली, परंतु मुंबई इंडियन्सच्या या कर्णधारासमोर सातत्य राखण्याचे आव्हान आहे. इतर वरिष्ठ खेळाडू खास करून सूर्यकुमार यादवचा फॉर्म खराब चालत असताना रोहितने चांगली कामगिरी करणे गरजेचे बनले आहे. मोसमातील पहिल्याच सामन्यात हजेरी लावल्यानंतर कोपराच्या समस्येमुळे बाहेर पडलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा मुंबई इंडियन्स संघातून खेळण्याची शक्यता नाही. त्यामुळे जेसन बेहरेनडॉर्फ आणि रिले मेरेडिथ यांना वेगवान गोलंदाजीच्या विभागाची जबाबदारी पेलावी लागेल. फिरकीपटू पियुष चावलाने मागील सामन्यात 22 धावा देऊन 3 बळी घेतले होते. त्याचा तो फॉर्म कायम राहण्याची अपेक्षा संघ बाळगून असेल.
केकेआरने गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबादविरुद्ध शेवटपर्यंत झुंज दिलेली आहे. याचा विचार करून पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा सारा भरवसा टीम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, तिलक वर्मा आणि इशान किशन या त्यांच्या युवा खेळाडूंवर राहील. मुंबईला रिंकू सिंगचा सर्वांत मोठा धोका असेल, कारण या डावखुऱ्या फलंदाजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मागील दोन सामन्यांमध्ये नाबाद 48 आणि 58 अशा खेळी केलेल्या आहेत. याशिवाय, कर्णधार नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज आणि शार्दुल ठाकूर यांनी केकेआरसाठी चांगले योगदान दिलेले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सना सर्व विभागांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
तथापि, केकेआरला त्यांचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलबाबत चिंता असेल. त्याला धावा काढताना संघर्ष करावा लागलेला आहे. शिवाय शुक्रवारी रात्री कोलकाता येथे तो षटकांचा कोटा पूर्ण करू शकला नाही, कारण त्याला दुखापत झाली होता. गुरबाजने आपली भूमिका चोखपणे पार पाडल्यामुळे केकेआरला स्फोटक इंग्लिश फलंदाज जेसन रॉयला अव्वल स्थानावर वापरायचे आहे की नाही हे पाहावे लागेल. त्यांच्या सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनीही बळी घेतले आहेत. याशिवाय अलीकडेच बांगलादेशचा यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दास देखील त्यांना येऊन मिळालेला आहे.









