आज ‘चेन्नई सुपर किंग्स’शी ईडन गार्डन्सवर सामना
वृत्तसंस्था/ मडगांव
कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज रविवारी चेन्नई सुपर किंग्सशी होणार असून यावेळी पुनरागमन करून आपली तीन सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी ‘केकेआर’ उत्सुक असेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स यांच्याविरुद्ध दोन विजय प्राप्त केल्यानंतर नितीश राणाच्या नेतृत्वाखालील संघ आश्वासक दिसत होता. मात्र अचानक त्यांनी सूर गमावल्याचे दिसते.
‘केकेआर’ सहा सामन्यांत चार गुण घेऊन आता गुणतालिकेवर आठव्या स्थानावर आहे. त्यांच्या पराभवाचा सिलसिला घरच्या मैदानावर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सुरू झाला. त्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून सलग पराभव पत्करले. दोन पराभवानंतर गडबडलेल्या ‘केकेआर’ने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चार बदल केले. पण त्याचा परिणाम असा झाला की, दिल्लीने सलग पाच पराभवांनंतर हंगामातील पहिला विजय मिळवला.
कोलकाता नाईट रायडर्सच्या तिन्ही पराभवांमध्ये फलंदाजांचे सामूहिक अपयश आणि गोलंदाजांची चांगली कामगिरी ही समान बाब दिसून येते. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तर ‘केकेआर’ने 67 चेंडू वाया घालविले आणि हंगामातील सर्वांत वाईट फलंदाजीची नोंद करताना डाव केवळ 127 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ‘आयपीएल’ हंगाम अर्ध्यावर आलेला असता केवळ संघरचना बदलण्याऐवजी मूळ समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘केकेआर’चा इंग्लिश सलामीवीर जेसन रॉयला अफगाणी क्रिकेटपटू गुरबाज रहमानउल्लाच्या जागी संधी दिल्यानंतर त्याने सलामीला बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. मात्र लिटन दासचे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचे पदार्पण खराब राहिले. बांगलादेशचा हा यष्टीरक्षक-फलंदाज केवळ फलंदाजीतच अपयशी ठरला नाही, तर अक्षर पटेल व जयंत यादव यांना यष्टीचित करण्याची संधीही त्याने चुकविली. त्यामुळे भारतीय खेळाडू नारायण जगदीशनकडे यष्टीरक्षण व सलामीवीराची दुहेरी जबाबदारी ते सोपवू शकतात. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातील ‘केकेआर’साठीची सर्वांत मोठी सकारात्मक बाब म्हणजे आंद्रे रसेलचे फॉर्ममध्ये परतणे. त्यांचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन देखील जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल.
केकेआरचा कर्णधार राणासाठी ही मोठी परीक्षा असेल. कारण महेंद्रसिंह धोनीचा हा कदाचित ईडन गार्डन्सवरील शेवटचा सामना राहणार असल्याने रसिकांच्या भावना त्याच्या बाजूने असतील. चेन्नईच्या डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामीच्या जोडीला सूर गवसलेला असून कॉनवे हा फिरकीपटूंचा सामना करण्यात पटाईत आहे. मोईन अली, रवींद्र जडेजा आणि महेश थिक्षाना हे ‘सीएसके’चे फिरकी त्रिकूट ईडन गार्डन्सवर गोलंदाजी करण्यास उत्सुक असेल. पण त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज हा श्रीलंकेचा वेगवान मथिशा पाथिराना असून तो रिंकू सिंग, रसेलसारख्या फटकेबाजांविरुद्ध कशी गोलंदाजी करतो ते पाहणे रंजक ठरेल.
संघ : कोलकाता नाईट रायडर्स : नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वऊण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, रिंकू सिंग, एन. जगदीशन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, लिटन दास, मनदीप सिंग, जेसन रॉय.
चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, दीपराज सिंह, सिमरजित सिंग, दीपक चाहर, प्रशांत सोळंकी, महेश थिक्षाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशिद, निशांत सिद्धू, सिसांडा मगाला, अजय मंडल, भगत वर्मा, आकाश सिंग.









