दोन्ही संघांना एक-एक गुण : पंजाब पुन्हा टॉप 4 मध्ये : मुंबईची पाचव्या स्थानी घसरण
वृत्तसंस्था/ कोलकाता
शनिवारी ईडन गार्डन्सवर केकेआर व पंजाब यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे. सामन्यातील दुसऱ्या डावात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. यानंतर बराच वेळ पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी खेळण्याच्या दर्जाची करण्यासाठी ठराविक वेळ लागतो. मात्र वेळेची मर्यादा असल्याने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे.
प्रारंभी, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रियांश आर्या व प्रभसिमरन सिंग यांच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 4 गडी गमावत 201 धावा केल्या. पण, या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या डावात पावसाचा अडथळा आला. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर पाऊस न थांबल्याने शेवटी हा सामना रद्द करण्यात आला.
मुंबईची पाचव्या स्थानी घसरण, पंजाब चौथ्या स्थानी
कोलकाता व पंजाब यांच्यातील सामना रद्द झाल्याने पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. या सामन्याआधी मुंबई आणि पंजाब हे दोन्ही संघ प्रत्येकी 5-5 विजयांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी होते. पंजाबच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र सामना रद्द झाल्यानंतर कोलकाता आणि पंजाबला प्रत्येकी 1-1 गुण मिळाला. त्यानंतर पंजाबचे 11 पॉइंट्स झाले असून गुणतालिकेत ते आता चौथ्या स्थानावर आहेत. मुंबईची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवत मुंबईचा पुन्हा टॉप-4 मध्ये येण्याचा प्रयत्न असेल.









