वृत्तसंस्था/ मुल्लानपूर
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने घातलेल्या धुमाकुळामुळे अडचणीत आलेल्या पंजाब किंग्सला पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सच्या रुपाने आव्हानात्मक संघाचा सामना करावा लागणार आहे. 245 धावांचा मोठा आकडा गाठल्यानंतरही संघ पराभूत होणे हे दुर्मिळ असते. परंतु सनरायझर्स हैदराबादविऊद्धच्या मागील सामन्यात अभिषेक शर्माने फक्त 55 चेंडूंत 141 धावांची तुफानी खेळी केल्यामुळे पंजाब किंग्सला पचवण्यास कठीण अशा पराभवाला सामोरे जावे लागले.
आज पंजाब मुल्लानपूर येथे घरच्या मैदानावर खेळेल. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल राहणार आहे. मुल्लानपूरमधील दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केलेल्या संघाने 200 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. हैदराबादविरुद्धच्या लढतीने पंजाबच्या गोलंदाजी विभागाचा, विशेषत: युजवेंद्र चहल व ग्लेन मॅक्सवेल या फिरकी गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत झाला असेल. कारण त्यांनी मिळून सात षटकांत 96 धावा दिल्या आणि येथेच समस्या आहे.
जर पंजाबने सपाट खेळपट्टी निवडली, तर गोलंदाजी विभाग 220 पर्यंतच्या धावसंख्येचा बचाव करू शकेल याची हमी नाही. कारण केकेआरकडे सुनील नरेन, रिंकू सिंग, वेंकटेश अय्यरसारखे खेळाडू आहेत. त्यातच पंजाबच्या कोणत्याही गोलंदाजाने प्रति षटक 9 पेक्षा कमी धावा दिलेल्या नाहीत. एरव्ही विश्वासार्ह पर्याय राहिलेल्या चहलने पाच सामन्यांमध्ये प्रति षटक 11.13 धावा दिल्या आहेत आणि फक्त दोन बळी मिळवले आहेत. दुसरीकडे, जर अय्यर व पॉन्टिंग यांनी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टी तयार करण्यास सांगितले, तर ते त्यांच्यावर बूमरँग होऊ शकते. कारण केकेआरकडे देशातील सर्वांत प्रभावी टी-20 फिरकी गोलंदाज वऊण चक्रवर्तीच्या रुपाने आहे. शिवाय सुनील नरेन आहे. तसेच चेपॉकवर चेन्नईच्या केलेल्या पराभवामुळे केकेआरचा आत्मविश्वास भरपूर वाढलेला असेल.
पंजाब किंग्सची फलंदाजी कर्णधार अय्यरवर (250 धावा) मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. प्रियांश आर्य (194 धावा) हा त्यांचा हंगामातील सर्वोत्तम शोध आहे. याशिवाय नेहल वधेरा (141 धावा), प्रभसिमरन सिंग (133 धावा) आणि फिनिशर शशांक सिंग (108 धावा) हे देखील संघाला खूप मजबुती देतात. पण पंजाबचा कमकुवत दुवा त्यांचे भारतीय खेळाडू नाहीत, तर ग्लेन मॅक्सवेल (34 धावा) आणि मार्कस स्टोइनिस (59 धावा) हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत, ज्यांनी आतापर्यंत फलंदाजीत फारसे योगदान दिलेले नाही.
संघ
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, जोश इंग्लिस, झेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, एरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्ला उमरझाई.
कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, लुवनीथ सिसोदिया, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, मोईन अली, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्टजे, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, सुनील नरेन, वऊण चक्रवर्ती आणि चेतन साकारिया.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









