पंजाबवर 5 गड्यांनी मात, सामनावीर रसेलची खेळी ठरली निर्णायक, रिंकूचा विजयी चौकार
वृत्तसंस्था/ कोलकाता
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथील इडन गार्डन्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार नितीश राणाचे अर्धशतक तसेच रॉय, रसेल आणि रिंकू सिंग यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जचा 5 गड्यांनी पराभव केला. कर्णधार शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने 180 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरादाखल खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 5 बाद 182 धावा जमवित विजय मिळविला. या स्पर्धेतील हा 53 वा सामना आहे.

कोलकाता संघाने डावाला सावध पण भक्कम सुरुवात केली. रॉय आणि गुरबाज या सलामीच्या जोडीने 28 चेंडूत 38 धावांची भागिदारी केली. इलिसने गुरबाजला पायचीत केले. त्याने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. सलामीचा फलंदाज जेसन रॉय डावातील आठव्या षटकात ब्रारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 24 चेंडूत 8 चौकारांसह 38 धावा जमविल्या. कर्णधार नितीश राणाने दमदार फलंदाजी करत वेंकटेश अय्यरसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी केली. राहुल चहरने अय्यरला झेलबाद केले. त्याने 13 चेंडूत 11 धावा जमविल्या. कर्णधार राणा 16 व्या षटकात तंबूत परतला. राहुल चहरने त्याला लिव्हींगस्टोनकडे झेल देण्यात भाग पाडले. राणाने 38 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 51 धावा जमविल्या. रसेल आणि रिंकू सिंग या जोडीने फटकेबाजी करीत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेले. रसेलने 23 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 42 धावा जमविल्या. दरम्यान शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर रसेल धावचीत झाला. यावेळी कोलकाता संघाला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून पंजाब किंग्जचे आव्हान संपुष्टात आणले. रिंकू सिंगने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 21 धावा फटकावल्या. कोलकाता संघाला अवांतराच्या रुपात 4 धावा मिळाल्या. कोलकाता संघाकडून 6 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. पंजाब किंग्जतर्फे इलिस आणि ब्रार यांनी प्रत्येकी 1 तर राहुल चहरने 2 गडी बाद केले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात कोलकाता नाईट रायडर्सने 11 सामन्यातून 10 गुणासह पाचवे तर पंजाब किंग्जने 11 सामन्यातून 10 गुणासह 7 वे स्थान मिळविले आहे. नेट रनरेटवर कोलकाताने पंजाबला मागे टाकले आहे.
शिखर धवनचे अर्धशतक
या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार धवन यांनी पहिल्या दोन षटकात 21 धावा झोडपल्या. हर्षित राणाने प्रभसिमरन सिंगला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 12 धावा जमविल्या. हर्षित राणाने पंजाबला आणखी एक धक्का देताना राजपक्षेला खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा रस्ता दाखविला. लिव्हिंगस्टोन अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. वरुण चक्रवर्तीने त्याला पायचीत केले. लिव्हिंगस्टोनने 9 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. पंजाब किंग्जने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 58 धावा जमविताना 3 गडी गमाविले. पंजाबचे अर्धशतक 32 चेंडूत फलकावर लागले. कर्णधार धवन आणि जितेश शर्मा यांनी चौथ्या गड्यासाठी 7 षटकात 53 धावांची भर घातली. वरुण चक्रवर्तीने जितेश शर्माला गुरबाजकरवी झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. कर्णधार धवनने 41 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. हर्षित राणाने धवनला अरोराकरवी झेलबाद केले. त्याने 47 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 57 धावा जमविल्या. धवन डावातील 15 व्या षटकात बाद झाला. पंजाब संघाने 150 धावांचा टप्पा 131 धावात गाठला. ऋषी धवन चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. सॅम करण 4 धावावर झेलबाद झाला. कोलकाता संघातील गुरुबाजने चपळ क्षेत्ररक्षण करताना 3 अप्रतिम झेल टिपले. शाहरुख खान आणि ब्रार या जोडीने डावातील शेवटच्या षटकात 21 धावा जमविल्याने पंजाबला 179 धावांपर्यंत मजल मारता आली. शाहरुख खानने 8 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 21 तर ब्रारने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 17 धावा जमविल्या. पंजाबच्या या जोडीने आठव्या गड्यासाठी अभेद्य 40 धावांची भागिदारी केली. पंजाबच्या डावात 6 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. कोलकाता संघातर्फे वरुण चक्रवर्तीने 26 धावात 3, हर्षित राणाने 33 धावात 2 तर सुयश शर्मा आणि नितिश राणा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – पंजाब किंग्ज : 20 षटकात 7 बाद 179 (प्रभसिमरन सिंग 8 चेंडूत 12 धावा, शिखर धवन 47 चेंडूत 57, लिव्हींगस्टोन 9 चेंडूत 15, जितेश शर्मा 18 चेंडूत 21, सॅम करण 4, ऋषी धवन 11 चेंडूत 19, शाहरुख खान 8 चेंडूत नाबाद 21, हरप्रित ब्रार 9 चेंडूत नाबाद 17, अवांतर 13, चक्रवर्ती 3-26, हर्षित राणा 2-33, सुयश शर्मा 1-26, नितीश राणा 1-7). कोलकाता नाईट रायडर्स : 20 षटकात 5 बाद 182 (रॉय 24 चेंडूत 38, गुरबाज 12 चेंडूत 15, नितीश राणा 38 चेंडूत 51, वेंकटेश अय्यर 13 चेंडूत 11, रसेल 23 चेंडूत 42, रिंकू सिंग 10 चेंडूत नाबाद 21, अवांतर 4, राहुल चहर 2-23, इलिस 1-29, ब्रार 1-4).









