कोलकाता संघाचा केवळ एका धावेने पराभव, रिंकू सिंगची एकाकी झुंज निष्फळ
वृत्तसंस्था/ कोलकाता
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने कडव्या कोलकाता नाईट रायडर्सचा केवळ एका धावेने पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे. आता या स्पर्धेत गुजरात जायंट्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स या तीन संघांनी बाद फेरी गाठली असून रविवारच्या दोन सामन्यानंतर बाद फेरीतील चौथा संघ निश्चित होईल.
निकोलास पूरनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 बाद 176 धावा जमवित कोलकाता संघाला विजयासाठी 177 धावांचे माफक आव्हान दिले. या स्पर्धेतील हा 68 वा सामना आहे. प्रत्युत्तरादाखल खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 7 बाद 175 धावा जमवल्याने त्यांना हा सामना केवळ एका धावेने गमवावा लागला. या पराभवामुळे कोलकाता संघाचे स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच समाप्त झाले. कोलकाता संघातील रिंकू सिंगची नाबाद 67 धावांची चिवट खेळी अखेर निष्फळ ठरली.
कोलकाता संघाच्या डावाला रॉय आणि वेंकटेश अय्यर यांनी दमदार सुरुवात करून देताना 35 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात कोलकाताने 61 धावा जमवताना एकमेव गडी गमावला. वेंकटेश अय्यरने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 24 धावा जमवल्या. गौतमने त्याला झेलबाद केले. नितीश राणा 8 धावावर तर गुरबाज 10 धावावर बाद झाले. कोलकाताचे पहिले अर्धशतक 26 चेंडूत तर शतक 76 चेंडूत फलकावर लागले. रिंकू सिंगने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून एकाकी लढत दिली. रिंकू सिंगच्या फटकेबाजीमुळे लखनौला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झगडावे लागले. रिंकू सिंगने 33 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 67 धावा जमवल्या.
डावातील शेवटचे षटक यश ठाकूरने टाकले. या शेवटच्या षटकात कोलकाता संघाला 21 धावांची जरुरी होती. यश ठाकूरचे हे षटक 8 चेंडूंचे ठरले. त्याने दोन वाईड चेंडू टाकले. दरम्यान रिंकू सिंगने या षटकामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर कोलकाताला विजयासाठी 8 धावांची जरुरी होती पण रिंकू सिंगने षटकार खेचल्याने कोलकाता संघाला हा सामना केवळ एका धावेने गमवावा लागला. कोलकाता संघाच्या डावात 7 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. त्यांना अवांतराच्या रुपात 9 धावा मिळाल्या.
या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी दिली. सलामीचा करण शर्मा तिसऱ्या षटकातच बाद झाला. राणाने त्याला 3 धावावर झेलबाद केले. डी कॉक आणि मंकड यांनी दुसऱ्या गड्यासाठी 41 धावांची भागिदारी केली. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात लखनौने 54 धावा जमविताना 1 गडी गमाविला. लखनौचे अर्धशतक 36 चेंडूत फलकावर लागले. मंकडने 20 चेंडूत 5 चौकारांसह 26 तर डी कॉकने 27 चेंडूत 2 षटकारांसह 28 धावा जमविल्या. स्टोईनिस खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. पहिल्या 10 षटकांमध्ये लाखनौने आपले 5 गडी गमाविताना 73 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार पांड्या सुनील नरेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 1 षटकारासह 9 धावा केल्या. बदोनीने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25 धावा जमविताना पूरन समवेत 6 व्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केली. 18 व्या षटकात बदोनी बाद झाला. पूरनने 30 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह 58 धावा जमविल्या. तो ठाकूरच्या गोलंदाजीवर 19 व्या षटकात झेलबाद झाला. बिस्नॉईने केवळ 2 धावा जमविल्या. गौतम 1 षटकार आणि 1 चौकारासह 4 चेंडूत 11 धावांवर नाबाद राहिला. लखनौला अवांतराच्या रुपात 12 धावा मिळाल्या. लखनौने पहिल्या 1 ते 6 षटकांमध्ये एक गडी गमाविताना 54 धावा जमाविल्या. त्यानंतर 7 ते 15 षटकादरम्यान त्यांनी 4 गडी गमाविताना 65 धावा केल्या. शेवटच्या 16 ते 20 षटकांमध्ये लखनौने 57 धावा फटकाविताना 3 गडी गमाविले. कोलकाता संघातर्फे वैभव अरोरा, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन यांनी प्रत्येकी 2 तर हर्षित राणा व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – लखनौ सुपर जायंट्स : 20 षटकात 8 बाद 176 (कर्ण शर्मा 3, डी कॉक 27 चेंडूत 28, प्रेरक मंकड 20 चेंडूत 26, कृणाल पांड्या 8 चेंडूत 9, बदोनी 21 चेंडूत 25, पूरन 30 चेंडूत 58, के. गौतम 4 चेंडूत नाबाद 11, अवांतर 12, ठाकूर 2-27, अरोरा 2-30, सुनील नरेन 2-28, हर्षित राणा 1-21, चक्रवर्ती 1-38).
कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकात 7 बाद 175 (रॉय 28 चेंडूत 45, वेंकटेश अय्यर 15 चेंडूत 24, नितीश राणा 8, गुरबाज 15 चेंडूत 10, रिंकू सिंग 33 चेंडूत नाबाद 67, रसेल 7, शार्दुल ठाकूर 3, सुनील नरेन 1, वैभव अरोरा नाबाद 1, अवांतर 9, बिस्नोई 2-23, यश ठाकूर 2-31, कृणाल पांड्या 1-30, के. गौतम 1-26).