आयपीएल 16 ः सामनावीर रिंकू सिंगचे अखेरच्या 5 चेंडूत 5 षटकार, वेंकटेश अय्यरचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार ठोकत रविवारी येथे झालेल्या आयपीएलमधील सामन्यात केकेआरला गुजरात टायटन्सवर 3 गडय़ांनी सनसनाटी विजय मिळवून दिला. सामनावीराचा बहुमानही त्यानेच मिळविला. गुजरातचा हा तीन सामन्यातील पहिला पराभव आहे तर पेपेआरचा हा दुसरा विजय आहे. या विजयानंतर गुणतक्त्यात केकेआरने सरस धावगतीच्या आधारे दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे.
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी निवडत निर्धारित 20 षटकांत 4 बाद 204 धावा जमवित केकेआरसमोर 205 धावांचे कठीण आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने 14 व्या षटकात 3 बाद 128 धावांपर्यंत मजल मारत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. पण हार्दिक पंडय़ाच्या जागी नेतृत्व करणाऱया रशिद खानने 17 व्या षटकात आंद्रे रसेल, सुनील नरेन व शार्दुल ठाकुर या तिघांना सलग चेंडूवर बाद करीत हॅट्टिक नोंदवून केकेआरला अडचणीत आणले.
रिंकू सिंगची षटकारांची बरसात
शेवटच्या 9 चेंडूत केकेआरला 39 धावांची गरज असताना नववा चेंडू डॉट बॉल गेला. आठव्या चेंडूवर रिंकूने शानदार षटकार ठोकला आणि पुढच्या चेंडूवर चौकार लगावत 10 धावा वसूल केल्या. त्यामुळे शेवटच्या 6 चेंडूत केकेआरला 29 धावांची गरज होती. यश दयालने टाकलेल्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर उमेश यादवने एक धाव घेतली आणि नंतरच्या पाच चेंडूवर सलग पाच षटकार ठोकत रिंकू सिंगने एक सनसनाटी विजय साकार करीत गुजरातच्या तेंडातील विजयाचा घास हिरावून घेतला. रिंकूने केवळ 21 चेंडूत एक चौकार, 6 षटकारांसह नाबाद 48 धावा झोडपल्या.

त्याआधी गुरबाज (15) व जगदीशन (6) लवकर बाद झाल्यानंतर वेंकटेश अय्यर व कर्णधार नितिश राणा यांनी डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 100 धावांची भागीदारी केली. अल्झारी जोसेफने राणाला बाद करून ही जोडी फोडली. राणाने 29 चेंडूतच 4 चौकार, 3 षटकार मारत 45 धावा फटकावल्या. रिंकूच्या साथीने 26 धावांची भर घातल्यानंतर वेंकटेश अय्यरलाही अल्झारी जोसेफने बाद केले. अय्यरने 40 चेंडूत तुफान फटकेबाजी करीत 8 चौकार, 5 षटकारांसह 83 धावा तडकावल्या होत्या. तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर रिंकू सिंगने उमेश यादवच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. गुजरातच्या रशिद खानने 37 धावांत 3, अल्झारी जोसेफने 27 धावांत 2 आणि शमी व जोश लिटल यांनी एकेक बळी मिळविला.

तत्पूर्वी, गुजरातने 17.3 षटकांत 4 बाद 153 धावांपर्यंत मजल मारली होती. पण अखेरच्या 15 चेंडूत विजय शंकरने डेव्हिड मिलरच्या साथीने तब्बल 51 धावा फटकावून काढत संघाला 4 बाद 204 धावांची मजल मारून दिली. विजय शंकरने त्याआधी चौथ्या गडय़ासाठी साई सुदर्शनसमवेत 24 चेंडूत 35 धावांची भागीदारी केली होती. सुदर्शनने 38 चेंडूत 3 चौकार, 2 चौकारांसह 53 धावा फटकावल्या. सुदर्शनने त्याआधी शुबमन गिलसमवेत दुसऱया गडय़ासाठी 44 चेंडूत 67 धावांची भर घातली होती तर गिलने वृद्धिमान साहासमवेत 33 धावांची सलामी दिली होती. गिल 31 चेंडूत 5 चौकारांसह 39 धावा काढून बाद झाला तर साहाने 17 धावा जमविल्या. याशिवाय अभिनव मनोहरने 8 चेंडूत 14 धावा फटकावल्या. विजय शंकरने 24 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांची आतषबाजी करीत नाबाद 63 धावा फटकावत संघाला दोनशेपारची मजल मारून दिली होती. केकेआरच्या सुनील नरेनने 33 धावांत 3, सुयश शर्माने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः गुजराजत टायटन्स 20 षटकांत 4 बाद 204 ः वृद्धिमाना साहा 17 (17 चेंडूत 3 चौकार), गिल 39 (31 चेंडूत 5 चौकार), साई सुदर्शन 53 (38 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), अभिनव मनोहर 14 (8 चेंडूत 3 चौकार), विजय शंकर नाबाद 63 (24 चेंडूत 4 चौकार, 5 षटकार), मिलर नाबाद 2, अवांतर 16. ः सुनील नरेन 3-33, सुयश शर्मा 1-35, शार्दुल ठाकुर 0-40, फर्ग्युसन 0-40, उमेश यादव 0-24, वरुण चक्रवर्ती 0-27.
संक्षिप्त धावफलक ः कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 7 बाद 227 ः रहमानुल्लाह गुरबाज 15 (12 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), एन. जगदीशन 6, वेंकटेश अय्यर 83 (40 चेंडूत 8 चौकार, 5 षटकार), नितिश राणा 45 (29 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), रिंकू सिंग नाबाद 48 (21 चेंडूत 1 चौकार, 6 षटकार), रसेल 1, सुनील नरेन 0, शार्दुल 0, उमेश यादव नाबाद 5, अवांतर 4. ः रशिद खान 3-37, अल्झारी जोसेफ 2-27, जोश लिटल 1-45, शमी 1-28, यश दयाल 0-69.








