दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 323 धावांनी विजय : न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतूनही बाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
भारत दौऱ्यानंतर मायदेशी परतलेल्या न्यूझीलंड संघाचा इंग्लंडने धुव्वा उडवला आहे. वेलिंग्टन येथे झालेली दुसरी कसोटी तब्बल 323 धावांनी जिंकत इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडसमोर विजयासाठी 583 धावांचे मोठे लक्ष्य होते, मात्र न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात 259 धावांवर ढेपाळला. विशेष म्हणजे, धावांच्या बाबतीन इंग्लंडने न्यूझीलंडवर मिळवलेला हा आतापर्यंतचा मोठा विजय आहे. याशिवाय, सलग दोन पराभवामुळे न्यूझीलंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 14 डिसेंबरपासून हॅमिल्ट येथे खेळवला जाईल.
पहिली कसोटी गमावल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पुनरागमन करेल अशी आशा होती पण तसे काहीच घडले नाही. प्रारंभी, इंग्लंडने हॅरी ब्रूकच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 280 धावा केल्या. झंझावाती फॉर्मात असलेल्या ब्रूकने 123 धावांची वेगवान खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 125 धावांतच आटोपला. गस अॅटकिन्सन आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी 4 विकेट्स पटकावल्या. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडने 155 धावांची मोठी आघाडी मिळवत दुसऱ्या डावात 427 धावांचा डोंगर उभारला. डकेटने 92 तर जेकब बेथेलने 96 धावांची आक्रमक खेळी केली. या पायावर कळस चढवत जो रुटने 106 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 583 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले.
किवीज फलंदाजांची शरणागती
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ठराविक अंतरात विकेट्स गमावल्या. विकेटकीपर फलंदाज टॉम ब्लंडेलने सर्वाधिक 115 धावा करत एकाकी झुंज दिली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. न्यूझीलंडचा डाव 259 धावांत आटोपला. इंग्लंडतर्फे बेन स्टोक्सने सर्वाधिक 3 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले. शतक आणि अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या हॅरी ब्रूकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 280 व दुसरा डाव 6 बाद 427 घोषित
न्यूझीलंड 125 व दुसरा डाव 54.2 षटकांत सर्वबाद 259 (टॉम लॅथम 24, डॅरिल मिचेल 32, टॉम ब्लंडेल 115, नॅथन स्मिथ 42, बेन स्टोक्स 3 बळी, शोएब बशीर, वोक्स व कारसे प्रत्येकी दोन बळी).
न्यूझीलंड फायनलच्या शर्यतीतून बाहेर
इंग्लंडच्या या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. सलग दोन पराभवामुळे न्यूझीलंडची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे तर इंग्लंडने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंड संघ आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडने भारत दौऱ्यावर सलग तीन कसोटी सामने जिंकून जेतेपदाच्या शर्यतीत सामील करुन घेतले होते, मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील पराभवामुळे तेही शर्यतीतून बाहेर पडले. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ फायनलच्या शर्यतीतून याआधीच बाहेर पडला आहे.









