मिचेल सँटेनरसह तीन खेळाडू जखमी
वृत्तसंस्था/ ऑकलंड
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन संघ पुढील महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. ऑसी संघ या दौऱ्यात किवीजविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. उभय संघात तीन सामन्यांची टी 20 मालिका होणार असून या मालिकेला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी यजमान न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ झाली आहे. -मिचेल सँटेनरसह तीन खेळाडू जखमी झाले आहेत. यामुळे हे चौघे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खेळणार का, याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विलियम ओरुकेला पाठदुखीमुळे 3 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागले आहे. विलियमआधी ग्लेन फिलिप्स, फिन एलन आणि मिचेल सँटनर या तिघांनाही दुखापतीने ग्रासले आहे. सँटनर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20 मालिकेत नेतृत्व करणार आहे. मात्र सँटनरला ग्रोईन इंजरीचा त्रास आहे. या मालिकेआधी तो फिट होईल, असा आशावाद किवीज क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे, ग्लेन फिलिप्सलाही गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे तर फिन एलनच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे हे दोघेही टी 20 मालिकेत खेळतील की नाही याबाबत शंका आहे. एकाचवेळी विलियम ओरुके, ग्लेन फिलिप्स आणि फिन एलन हे तिघे नसणे न्यूझीलंडसाठी अडचणीचे ठरु शकते.
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौरा
ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंड दौऱ्यात फक्त टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 1 ऑक्टोबरला होणार आहे. दुसरा सामना शुक्रवारी 3 ऑक्टोबरला तर 4 ऑक्टोबरला तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. हे तिन्ही सामने बे ओव्हल, माउंट माऊनगुनाई येथे होणार आहेत.









