विनायक पाटील /कुदनूर
कोरोनाकाळापासून मोठय़ा प्रमाणात पर्यटकांच्या मनात अधिराज केलेला किटवाडचा धबधबा शनिवारी रात्रीपासून प्रवाहित झाला आहे. यावर्षी धबधबा प्रवाहित होण्यास बराच विलंब झाला असला तरी शनिवारी व रविवारी याठिकाणी येणाऱया पर्यटकांची गर्दीही आहे. कर्नाटकच्या सीमेवर आणि चंदगड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या किटवाड गावाला याच धबधब्याने आणि लघुपाटबंधारे तलावांमुळे पर्यटनाच्या प्रकाशझोतात आणले. येथील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे लघुपाटबंधारे तलाव क्र. 1 पूर्णक्षमतेने भरला असल्याने सांडव्यातून ओव्हरफ्लो होणाऱया पाण्यामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे. जून महिन्यापासून कर्नाटकसह चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या परिसरातील पर्यटकांचा धबधब्याचे दर्शन घडत नसल्याने हिरमोड होत होता. मात्र, आता धबधबा पर्यटकांना साद घालत आहे.
किटवाडच्या पश्चिमेला व लघुपाटबंधारे क्र. 1 च्या उत्तरेकडे सांडव्यातील ओव्हरफ्लो होणाऱया पाण्यातून धबधब्याची निर्मिती झाली आहे. धबधबा आणि तलावाच्या परिसरात एकदा आलेला पर्यटक पुन्हा-पुन्हा येतोच. तसेच तुडूंब भरलेल्या तलावाचे सौंदर्य व फेसाळणारा धबधबा पर्यटकांना बराच काळ येथे थांबवून ठेवण्यास कारणीभूत ठरतो.









