पूर्वतयारी बैठकीत पालकमंत्र्यांची महिती
बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे कित्तूर विजयोत्सव वैशिष्ट्यापूर्णरित्या साजरा करण्यात येईल. हा उत्सव आदर्श ठरण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. सर्व कार्यक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. जिल्हा प्रशासन व कन्नड-सांस्कृतिक खाते यांच्या संयुक्त विद्यमाने कित्तूर येथील वीरभद्रेश्वर कल्याण मंडपात सोमवार दि. 6 रोजी झालेल्या कित्तूर उत्सव-2025 पूर्वतयारी बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उत्सवामध्ये स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात यावे. कित्तूरमधील स्मारकांची सुधारणा करण्यात यावी, विद्युत रोषणाई, पुलाची स्वच्छता, बसस्थानकाची दुरुस्ती यासारखी कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. उदयोन्मुख साहित्यिक, स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मंत्री जारकीहोळी म्हणाले. कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, कित्तूर विजयोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या वीरज्योती मिरवणुकीत वैशिष्ट्यापूर्ण चित्ररथ समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. विचार मंथनमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येईल.
कित्तूरचा इतिहास जनतेला समजावून देण्याच्या उद्देशाने पुस्तक प्रकाशन करण्यात येईल. कित्तूरसाठी नव्या बससेवा लवकरच सुरू होणार असून यामुळे नागरिकांना सोयीचे होणार आहे. मागील वर्षी नागरिकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार समितींची रचना करण्यात येईल. यंदाच्याही कित्तूर उत्सवात नागरिक लाखोंच्या संख्येने सहभागी होतील, यादृष्टीने तयारी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले. त्यानंतर कित्तूर कलमठचे मडिवाळ राजयोगिंद्र महास्वामी यांनी विचार मांडले. यंदाचा कित्तूर विजयोत्सव मोठ्याने साजरा करण्याच्यादृष्टीने तयारी करावी, असे ते म्हणाले. याप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल ठरणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, बैलहोंगलचे प्रांताधिकारी प्रवीण जैन, कित्तूरचे तहसीलदार कलगौडा पाटील, कन्नड-सांस्कृतिक खात्याचे के. एच. चन्नूर यांसह विविध खात्यांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.









