विजयज्योतीचे स्वागत : सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : ऐतिहासिक कित्तूर उत्सवाला सोमवारी थाटात प्रारंभ झाला. नंदीध्वजारोहणाने कित्तूर उत्सवाला चालना देण्यात आली. बेंगळूर येथून आलेल्या विजयज्योतीचे स्वागत करून पूजन करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, कित्तूर येथील राजगुरु संस्थान कलमठचे श्री मडिवाळ राजयोगिंद्र स्वामीजी आदींनी राणी चन्नम्मा, आमटूर बाळाप्पा व संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विविध कलापथकांचा समावेश असलेल्या मिरवणुकीला चालना दिली. सुवासिनींनी पूर्ण कुंभ घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. ढोल वादन, झांज पथक, लमाणी नृत्य, नगारी, कथ्थकली आदी विविध सांस्कृतिक कलांचे दर्शन घडविणाऱ्या पथकांनी मिरवणुकीत कला सादर केली. सरकारच्या गृहलक्ष्मी, गृहज्योतीसह पाच गॅरंटींविषयी माहिती देणारा चित्ररथही होता. मिरवणुकीत भाग घेतलेल्या प्रत्येकाला पिवळा फेटा बांधण्यात आला. प्रथमच ऐतिहासिक कित्तूर किल्ल्याजवळ सुरू करण्यात आलेल्या वस्तू प्रदर्शनाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी उद्घाटन केले. या वस्तू प्रदर्शनात 128 गाळे आहेत. कृषी, आरोग्य, पशुसंगोपन, मत्स्योद्योग, ग्रामीण विकास आदींसह परिसरातील शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी प्रदर्शनात व्यवस्था करण्यात आली आहे. बागायत खात्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फल-पुष्प प्रदर्शनाचे खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचेही स्थानिक आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माहिती खात्याचे अधिकारी गुरुनाथ कडबूर, मुरलीधर कारभारी आदींसह अधिकारी उपस्थित होते.









