लोणावळा : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे यांच्या हत्येप्रकरणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर शुक्रवारी रात्री उशिरा खून व खूनचा कट रचणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर आवारे यांची आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सुलोचना आवारे यांच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आमदार सुनील शेळके, उद्योजक सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (सर्व राहणार तळेगाव दाभाडे, मावळ) व श्याम निगडकर यांचे तीन साथीदार (नाव पत्ता माहित नाही) अशा सात जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवारे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, आमदार सुनिल शेळके, सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे असे किशोर आवारे यांनी मला सांगितले होते. मागील काही महिन्यांपासून त्याच्यात सतत खटका खटकी होत होती. सामाजिक कार्यासह राजकारणात किशोर आवारे सक्रिय झाले होते. सुनिल शेळके यांचे ते प्रमुख राजकीय विरोधक होते. माझ्या चालकाला देखील सुधाकर शेळके यांनी जातीचावक शिविगाळ केली होती असे फिर्यादीत म्हटले आहे. वरील सर्वांनी संगनमत करुन तळेगाव नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात श्याम निगडकर व त्याच्या तीन साथीदारांनी किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दुपारी बंदूकीतून गोळ्या झाडत व कोयत्याने वार करत त्यांची हत्या केली असल्याची फिर्याद सुलोचना आवारे यांनी दिली आहे. दरम्यान सिसीटिव्ही फुटेजमधून आरोपीचे चेहरे समोर आले आहेत, प्रत्यक्ष साक्षीदार देखील उपलब्ध असल्याने आरोपींच्या मागावर क्राईम ब्रांचची पथके रवाने करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पद्माकर घनवट व काकासाहेब डोळे यांनी दिली.
राजकीय आकसातून गुन्हा दाखल – आमदार सुनिल शेळके
किशोर आवारे हत्याप्रकरणी माझ्यावर व माझ्या भावावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय आकसातून झाला आहे. मला बदनाम करुन राजकारणातून उध्वस्त करण्याचा घाणेरडा प्रयत्न केला जात आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शेळके यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिली आहे. शेळके म्हणाले, मी व किशोर आवारे यांनी एकत्र काम केले आहे. आमच्यात मतभेद होते. मात्र मनभेद कधीच नव्हते. माझ्या जनतेने मला जनतेची सेवा करण्यासाठी त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार केले आहे. कोणाच्या जीवावर उठण्यासाठी नाही. माझ्यावर आजपर्यंत साधी एनसी देखील दाखल नाही. कोणाचा जीव घेण्याऐवजी मी राजकारणातून बाहेर पडेन, अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत शेळके यांनी पोलीस यंत्रणांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.








