बेळगाव : साईराज स्पोर्टस क्लब आयोजित 11 व्या साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मराठा स्पोर्टस शिवाजी तरूण मंडळाने, डिजे बाईज मुडंगोड व अप्पा एफसीचा तर किसन कंग्राळकर पीटीएम कोल्हापूरने, के. आर. शेट्टी वास्को संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावरती सुरू असलेल्या साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात तनय के. आर. शेट्टी वास्को संघाने लिव्होएफसी धारवाडचा 4-0 असा पराभव केला. 25 व्या मि. वास्कोच्या ओलीनने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 28 व्या मि. ओलीनच्या पासवर झामाने गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात वास्कोच्या झामाने 34 व 46 मि. ला सलग दोन गोल करून स्पर्धेची पहिली हॅट्रीक नोंदवित 4-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सामन्यात मराठा स्पोर्टस शिवाजी तरूण मंडळ कोल्हापूरने डिजे बाईज मुडंगोडचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाचा गोलफरक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 31 व 42 मि. ला शिवाजी तरूण मंडळच्या करण चव्हाणने सलग दोन गोल केले. 44 मि. देवराज मंडलीकने तिसरा गोल केला. व 54 व्या मिनिटाला रोहण अदनाईकने सलग दोन गोल करून 5-0 ची आघाडी मिळवून दिली. 59 व्या मिनिटाला इंद्रजित चौगुलेने सहावा गोल केला. तिसऱ्या सामन्यात अप्पा एफसीने स्निग्मेय एफसी पुणेचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात अप्पा एफसीच्या प्राजक्त कोलेकरने 3, प्रतिक कोलेकरने 2 गोल केले. चौथ्या सामन्यात किसन कंग्राळकर पीटीएम कोल्हापूरने, तनय के. आर. शेट्टी वास्कोचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 19 व 23 व्या. मि.ला पीटीएमच्या ओंमकार मोरेने सलग 2 गोल करून पहिल्या सत्रात 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 33 व्या. मि. ओंमकार मोरेच्या पासवर प्रथमेश हेरेकरने गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. पाचव्या सामन्यात मराठा स्पोर्टस शिवाजी तरूण मंडळने अप्पा एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आल्याने गोल फरक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात अतिरीक्त वेळेत (61 व्या मि.ला) मराठा स्पोर्टसच्या संकेत साळोकेने 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
शनिवारचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने 1)फास्ट फॉरवर्ड वि. किसन कंग्राळकर पीटीएम कोल्हापूर स. 9 वा., 2)राहुल के. आर. शेट्टी बेळगाव वि. मराठा स्पोर्टस शिवाजी तरूण मंडळ कोल्हापूर स. 10 वा., 3) इन्फीनीटी बेळगाव वि. सेसाएफसी गोवा यांच्यात 11 वा., 4)साईराज एफसी वि. दिलबहार कोल्हापूर यांच्यात 12 वा.









