शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरात कर्ज : गाव पातळीवर प्रक्रिया
बेळगाव : केंद्र सरकार प्रत्येक शेतकऱ्याला कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) चे वितरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. त्याचबरोबर शासनाकडून जमिनीवर कर्ज उपलब्ध करून दिले जाते. एक एकर जमिनीवर कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यासाठी आता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित केले जात आहे. राज्यात 47.80 लाख शेतकरी किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असून 35 लाख शेतकऱ्यांना केसीसी कर्ज वाटप केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांना केसीसी क्रेडिट सुविधा उपलब्ध केली आहे. कर्जाची परतफेड एक वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे. केंद्र सरकार केसीसी कर्जावर 7 टक्के व्याज आकारणी करते. त्यामध्ये वेळेत परतफेड करणाऱ्यांना 2 टक्के सूट दिली जाते. एटीएम कार्डप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. या कार्डमध्ये कृषी यंत्रसामग्री बरोबरच विम्याची सुविधा उपलब्ध आहे. पशुसंगोपनसाठी 2 लाख रुपये आणि इतर शेतीपूरक व्यवसायासाठीही कर्ज उपलब्ध होणार आहे.
विशेष मोहीम…
किसान क्रेडिट कार्ड सुविधा देण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविली आहे. गावपातळीवर शाखा अधिकारी या मोहिमेत सहभागी होत आहेत. याद्वारे आम्ही कार्ड न मिळालेल्या शेतकऱ्यांपर्यंत कार्ड पोहोचवत आहोत. शेतकऱ्यांनी ही सुविधा घ्यावी.
– प्रशांत कुलकर्णी, मॅनेजर, लीड बँक









