अभिनेत्री कीर्ति सुरेश लवकरच नानीसोबत ‘दशहरा’ या चित्रपटात दिसून येणार आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कीर्ति सुरेश ‘दशहरा’ चित्रपटातील स्वतःच्या कामामुळे अत्यंत आनंदी असल्याने तिने चित्रपटाच्या युनिटमधील सदस्यांना सोन्याच्या नाण्यांचे वाटप केले आहे.
‘दशहरा’मध्ये स्वतःच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करता आल्याने आनंदून गेलेल्या कीर्तिने स्वतःच्या सहकाऱयांचा याद्वारे गौरव केला आहे. कीर्ति चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या अखेरच्या दिवशी भावुक झाली होती. कीर्तिने चित्रपटाच्या टीमला 75 लाख रुपये खर्च करत सोन्याची नाणी वाटली आहेत.

‘दशहरा’ हा चित्रपट तेलगू भाषेत तयार होत असला तरीही तो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटात कीर्ति ही वेनेला नावाच्या भूमिकेत आहे. हा एक ऍक्शन ऍडव्हेंचर ड्रामापट असून याचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेलाने केला आहे. तसेच त्यानेच याची कहाणी लिहिली आहे. चित्रपटाची कहाणी तेलंगणातील कोळसा खाणींच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
कीर्ति ही दक्षिणीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तमिळ आणि तेलगूसह मल्याळी चित्रपटांमध्येही काम केले आहे. कीर्ति ही अभिनेत्री असण्यासह नृत्यांगना तसेच पार्श्वगायिका देखील आहे. कीर्तिने 2000 साली बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. तेलगू चित्रपट ‘महानती’साठी कीर्तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकाविला आहे.









