कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून भागवत संप्रदायाच्या विचारांची पताका अखेरच्या श्वासापर्यंत फडफडत ठेवणाऱ्या बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने कीर्तनाच्या एका अमोघ पर्वाचाच अस्त झाला आहे. वारकरी संप्रदायात कीर्तनाला अत्यंत अनन्यसाधारण स्थान आहे. नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।। असे संत नामदेव महाराज म्हणतात. त्यातील मथितार्थ समजून घ्यायला हवा. संतांनी आपल्या भजन, कीर्तनातून घरोघरी ज्ञानदीप लावण्याचे कार्य केले. त्यामुळेच खेड्यापाड्यात सर्वदूर ज्ञानाचा प्रकाश पोहोचू शकला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी भागवत धर्माचा पाया रचला. नामदेव महाराजांनी भागवत धर्माची ही पताका पंजाबपर्यंत नेऊन त्याचा विस्तार केला. तर तुकोबारायांनी त्यावर कळस चढविला. त्यानंतर भजन, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार, प्रवचनकारांनी भागवत धर्माचे व्यापक विचार तळागाळापर्यंत ऊजविण्याचे काम अथकपणे केले आहे. अशा या समृद्ध परंपरेतील महामेरू म्हणून बाबा महाराज सातारकर यांचा उल्लेख करता येईल. बाबा महाराजांचे मूळ नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे. 135 वर्षांहून अधिक काळ वारकरी संप्रदायाची परंपरा चालविणारे दादा महाराज सातारकर हे त्यांचे आजोबा. वडील ज्ञानेश्वर महाराज उत्कृष्ट मृदंगवादक, तर काकाही कीर्तनसेवक. स्वाभाविकच घरातूनच बाबा महाराजांना संस्कारांचे, संतविचारांचे बाळकडू मिळाले. त्यामुळे आठव्या वर्षापासून दादा महाराजांच्या कीर्तनात चाल म्हणणाऱ्या बाबांनी 12 व्या वर्षापासूनच आकाशवाणीवर गाण्यास सुऊवात केली. इंग्रजी माध्यमातील शिक्षण, वकिलीची पदवी त्यांनी प्राप्त केली खरी. पण, ना त्यात ते रमले ना फर्निचरच्या व्यवसायात. पारमार्थिक वारसा चालविण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, असे मानत त्यांनी फर्निचरचा कारखाना विकून टाकला नि संपूर्णपणे भजन, कीर्तनात स्वत:ला वाहून घेतले. या कीर्तनानेच त्यांना खऱ्या अर्थाने कीर्ती मिळवून दिल्याचे पहायला मिळते. रसाळ वाणी, ही त्यांना लाभलेली निसर्गदत्त देणगी. अमृताहुनी गोड असणाऱ्या या वाणीतून शब्द पाझरत तेव्हा प्रत्येक श्रोता त्यामध्ये रंगून जात असे. शब्दातील चढ-उतार, अचूक शब्दफेक यामुळे ते बघताबघता श्रोत्यांच्या मनाची पकड घेत. उपमा, अलंकार, शब्दकोट्या व प्रसंगनिष्ठ विनोदाची पखरण त्यांच्या कीर्तनास वेगळ्या उंचीवर नेई. साभिनयता हा त्यांच्या शैलीतील आणखी एक विशेष. त्यामुळे त्यांच्या कीर्तनास जिवंतपणा जाणवे. कुठेही कृत्रिमतेचा लवलेश नसे. बाबा महाराजांच्या कीर्तनाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे त्यांच्या भाषेतील सहजसुलभता, सोपेपणा. सर्वांना समजेल अशा भाषेत ते प्रवचन करीत. बोजड, अतर्क्य शब्दसंपदेपासून ते दूर राहत. त्यामुळे लोकांशी त्यांचा चटकन संवाद घडत असे. कीर्तनकाराला भक्तीचे, परंपरेचे महत्त्व विषद करीत असताना काळाचेही भान असावे लागते. आजचे मानवी आयुष्य, त्यातील प्रश्न, चालू घडामोडी, समाजमनाची स्थिती या सगळ्याला स्पर्श करीत कीर्तन पुढे गेले, तर ते अधिक प्रभावी ठरते. मुळात बाबा महाराजांना सामाजिक जाण, भान होते. भवतालात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर त्यांचे बारीक लक्ष असे. त्यामुळे त्यांच्या कीर्तन, प्रवचनात या साऱ्याचे दर्शन घडे. बाबा महाराजांचा कोमल आवाज, या आवाजातील अभंगाची एखादी समर्पक ओवी नि हृदयाचा ठाव घेणारे तितकेच सुंदर निऊपण, हे मागच्या काही दशकातील एक समीकरणच निर्माण झाले होते. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेशसह देशाच्या विविध भागांत त्यांनी असंख्य कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम केले. इतकेच नव्हे, तर अमेरिकेतील विविध शहरांतही त्यांनी ज्ञानेश्वरीवर प्रवचने दिली. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे मराठीइतकाच त्यांच्या हिंदी व इंग्रजी प्रवचनांमध्येही गोडवा चाखायला मिळे. भक्ती आणि प्रबोधन हे कीर्तनसेवेचे मुख्य दोन पैलू आहेत, असे ते मानत. त्यामुळे प्रबोधनावर त्यांचा भर राही. महाराष्ट्र हे देशातील सुसंस्कृत व सुधारणावादी राज्य मानले जाते. या राज्याच्या वैचारिक, सामाजिक विकासात संतविचारांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम । अमंगळ ।। असे संत तुकाराम महाराज म्हणतात. बाबा महाराजांनी हा गाभा ध्यानात घेऊन प्रबोधनाची समृद्ध परंपरा पुढे नेली. आरोग्यसेवा हादेखील त्यांच्या आवडीचा विषय. ‘श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थे’द्वारे त्यांनी जनसेवेचा वसा घेतला. 1983 पासून वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, वैद्यकीय तपासणी असे अनेक उपक्रम त्यांनी राबविलेले पहायला मिळतात. बाबा महाराजांच्या मौखिक साहित्याची गणती करता येणार नाही. किंबहुना त्यांचे लिखित साहित्यही विपुल व श्रीमंत म्हणता येईल असे. ‘ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी’ ही त्यांची गाजलेली ग्रंथसंपदा. चंदनाच्या पेटीतील ही ज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांना तोड नाही. याशिवाय चित्रमय ज्ञानेश्वरी, ऐश्वर्याची वचनाक्षरे श्री तुकाराम महाराजांच्या गाथा, उद्धवगीत अर्थात ऐश्वर्यवंत श्री एकनाथ भागवत, सद्गुरू दादामहाराज सातारकर यांची जीवनगाथा, चांगदेव पासष्टी सार्थ व विवरण यासह त्यांची अन्य ग्रंथसंपदा हा मौलिक ठेवाच होय. हा ठेवा तुम्ही आम्ही सर्वांनी जपला पाहिजे. वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर होते. कीर्तनाची वेळ व दिलेला शब्द ते कधी चुकवत नसत. नव्या पिढीतील कीर्तनकारांनी त्यांच्यातील वक्तशीरपणा, शिस्तबद्धता, अभ्यासू वृत्तीचा अंगीकार करायला हवा. बाबामहाराजांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि निऊपण सर्वांनाच आनंद देऊन जाई. आज या आनंदाला आपण पारखे झालो आहोत. बाबामहाराजांचे ‘विरहिणी भजन’ प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात हे भजन ते सादर करत व याद्वारे वातावरण भारावून टाकत असत. आज हरीच्या या दासाने इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठाच्या दिशेने गमन केल्याने रसिक, श्रोते अन् समाजमन विरहात बुडाले आहे. असे असले, तरी आपल्या कीर्तन-प्रवचनांतून ते कायम आपल्यासोबतच असणार आहोत.








