बिल्वदलचे सहावे कीर्तन संमेलन : दहा प्रख्यात कीर्तनकारांची सुश्राव्य कीर्तने
वार्ताहर /माशेल
बिल्वदल परिवार आयोजित 6 वे कीर्तन संमेलन रविवार 25 डिसें. रोजी सकाळी 9 वा. पासून खांडोळा येथील श्री गणपती मंदिराच्या सभागृहात होणार आहे. गोमंतकातील व गोव्याबाहेरील कीर्तनकारांची अविट गोडीची आणि पारंपारिक कीर्तनाचे सादरीकरण होणार असून एकूण दहा प्रख्यात किर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तने या कीर्तन संमेलनात होणार आहे.
बिल्वदलतर्फे साखळी येथील विठ्ठल मंदिरात दोन तर केरी-फोंडा येथील विजयादुर्गा संस्थानात तीन यापुर्वीची कीर्तन संमेलने झाली आहे. खांडोळा येथील हे सहावे कीर्तन संमेलन असेल. संमेलनाचा प्रारंभ डॉ. कु उर्वी फडके यांच्या ईशस्तवनाने होणार आहे. प्रख्यात लोक साहित्याचे गाडे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर यांच्याहस्ते कीर्तन संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष प्रतिमा खांडेपारकर व बिल्वदल परिवाराचे पदाधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 10 वा. मंगला चरण, प्रज्वलीता गाडगीळ सहकारी यांचा कार्यक्रम होईल. तद्नंतर कीर्तनास सुरूवात होईल.
कीर्तन संमेलनात ह.भ.प. वंदना जोशी, ह.भ.प. विष्णू गावस, ह.भ.प. सर्वेश साळगावकर, ह.भ.प. नुतन रेवाडकर, ह.भ.प. दत्तगुरू अभ्यंकर, ह.भ.प. उर्वी फडके, ह.भ.प. स्वतेजा कुंभार, ह.भ.प मनस्वी नाईक व खास आकर्षण ह.भ.प. संज्योत केतकर (पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन होईल.
पहिले सत्र दुपारी 1 वा. पर्यंत होणार असून दुपारी मध्यतरानंतर पुन्हा किर्तने सुरू होईल. सायंकाळी 4 वा. डॉ. गोविंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजच्या काळात कीर्तनाची गरज’ या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये डॉ. सोमनाथ कोरमपंत, प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, ह.भ.प. सुहासबुवा वझे व विवेकबुवा जोशी यांचा सहभाग असेल. सायंकाळी 5 वा. समारोपाचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून वीजमंत्री सुदिन ढवळीकर, प्रीतम खांडेपारकर, बिल्वदल परिवाराचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहतील. मान्यवरांच्याहस्ते कीर्तन क्षेत्रातील काही मान्यवरांचा सत्कार होईल. कीर्तन संमेलनाचा समारोप पुण्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सौ. ह.भ.प. संज्योत केतकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने होणार आहे.









