ऑनलाईन टीम / मुंबई :
शनिवारी रात्री खार पोलीस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याला भेटून बाहेर पडत असताना भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात गाडीची काच फुटून सोमय्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. मात्र, ही जखम कृत्रिम असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे राज्याच्या गृहखात्याने यामागची सत्यता पडताळण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत. एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याचे प्रकरण थेट दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांपर्यंत नेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनेही हालचाली सुरु केल्या आहेत. सोमय्यांना झालेली जखम कृत्रिम असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे सोमय्यांच्या हनुवटीवरील ती जखम खरचं हल्ल्यातून झाली, की ती जखम कृत्रिम आहे, याची पडताळणी होणार आहे. राज्याच्या गृहखात्याने त्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलीस दल किंवा गृहखात्याकडून अधिकृतपणे कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही.
शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत गाडीची काच फुटून हनुवटीला जखम झाल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. मात्र, ही जखम त्यामुळे झालेली नसावी, अशी शक्यता शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. पोलिसांनाही याबाबत शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी गृहखातं करणार आहे.








