ग्रा. पं. अध्यक्ष-सदस्यांची वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा : नुकसान टाळण्यासाठी झटका करंटची सोय करणार
वार्ताहर/गुंजी
गुंजी येथील जागृत आणि सुप्रसिद्ध देवस्थान श्री माउली देवी मंदिराच्या सभोवताली असलेल्या वनराईचा विकास आणि किरावळा येथील गोरक्षनाथ मठ धबधब्याचा विकास साधण्यात येणार आहे. या दृष्टिकोनातून गुंजी ग्रा. पं. अध्यक्षा स्वाती गुरव यांनी जिल्हा वनाधिकारी मरिया क्रिस्ताराजू डी. यांची आंबेवाडी येथील वनखात्याच्या विश्रामगृहात भेट घेऊन पंचायत व्याप्तीत अरण्य खात्याच्या सहकार्यातून विविध ठिकाणचा विकास साधण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली. याचबरोबर गुंजी ग्रामपंचायत व्याप्तीतील अनेक खेड्यांतील शेतकऱ्यांच्या भातपिकाचे वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय करण्यात आले.
यावेळी जिल्हा वनाधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांनी सदर योजनेखाली असलेल्या साहित्य व यंत्रणेची व्यवस्थित देखभाल करण्याची हमी दिल्यास वनखात्याच्या वतीने झटका करंटाची सोय करून दिली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच गुंजी गावच्या अमृतनगरमधून रणदेव कॉलनीला जोडणारा रस्ता हा वनखात्यातून जात असल्याने त्याही रस्त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. तर रोजगार हमी योजनेअंतर्गत गुंजी ग्रा.पं.व्याप्तीतील रोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वनखात्याने सहकार्य करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी वनाधिकारी सुनीता निंबरगी, लोंढा वनाधिकारी वाय. पी. तेज, खानापूर वनाधिकारी श्रीकांत पाटील, गुंजी सेक्सन फॉरेस्टर राजू पवार, ग्रा. पं. सदस्या सरोजा बुरुड, सचिव बाळू सनदी, ग्राम पंचायत माजी अध्यक्ष सुभाष घाडी आणि कर्मचारी उपस्थित होते.









