वार्ताहर /नंदगड
बेकवाड येथील लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात प्रमुख कुस्तीत कर्नाटक चॅम्पियन शिवानंद दड्डी याने तिसऱ्या मिनिटाला किरण शिंदेला निकाल डावावर चारीमुंड्या चीत करीत उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली. मैदानात प्रथमच महिलांच्या कुस्त्यांच्या आयोजनामुळे वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. सर्व कुस्त्या निकाली झाल्यामुळे कुस्तीशौकिनांनी समाधान व्यक्त केले. जनकाप्पा पाटील, शिवराम पाटील, महादेव पाटील, कल्लाप्पा पाटील, पुंडलिक पाटील, मारुती पाटील, मंजुनाथ पाटील, खिराप्पा गुरव, वसंत गुरव, एकनाथ पाटील, संतोष गुरव, रवींद्र बिर्जे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन शिवानंद दड्डी विरुद्ध किरण शिंदे यांच्यात लावण्यात आली. प्रारंभी दोघांनीही एकमेकाची ताकद अजमावली. दुसऱ्या मिनिटाला शिवानंद दड्डीने एकेरी पट काढून किरणला खाली घेतले. हाताची सांड काढून घीस्सा मारण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या मिनिटाला शिवानंद दड्डीने दुहेरी पट काढीत निकाल लावून निकालावरती किरण शिंदेला चीतपट करीत उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महांतेश वाली, आप्पाजी पाटील, पोलीस अधिकारी अरेर, अनिल देसाई, रवींद्र बिर्जे, विनोद गुरव, पुंडलिक कुराडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते संजू इंगळगी व श्रीकांत सांगली यांच्यात लावण्यात आली. सुरुवातीला श्रीकांत सांगलीने संजू इंगळगीला मोठे आव्हान निर्माण केले होते. दोघेही एकमेकांवर डाव प्रति डावने चीत करण्याचा प्रयत्न केला. 15 व्या मिनिटाला संजूने एकेरी पट काढत श्रीकांतवर ताबा मिळविला. मानेचा कस काढून घुटणा मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून श्रीकांतने सुटका करुन घेतली. 17 व्या मिनिटाला पायाला चाट मारुन श्रीकांतला खाली घेत श्रीकांतला मोळी बांधून मोळी डावावर विजय मिळविला.
बेकवाडचा विनायक गुरवने प्रतिस्पर्धी दिलीप सांगलीचा पहिल्याच मिनिटाला निकाली डावावर चीतपट करून उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली. त्याला कुस्तीशौकीनांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन चिकदिनकोपने गजानन सांगलीला एकलांगी डावावर चीतपट केले. पाचव्या क्रमांकाची कुस्ती हणमंत गंदीगवाडने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करुन विजय संपादन केला. मैदानात बजरंग इंगळगी, परशराम केसरेकर बेकवाड, महादेव इटगी, सुरज मंगळवाड, सुरज खंदूर, जोतीबा चापगाव, नागराज झेंडे आदींनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला. बेकवाड कुस्ती मैदानात यावर्षी प्रथमच महिलांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. मैदानात अदिती कोरे बेळगाव, भक्ती गावडा मोदेकोप, शितल सुतार, मनस्वी जायण्णाचे बेळगाव, दिया मोहिते अनगोळ, राधिका अनगोळ, प्रभा शिवनगेकर खादरवाडी आदींनी विजय मिळविला. मेंढ्याच्या कुस्तीत पार्थ पाटील कंग्राळीने विजय मिळवून मेंढ्याचे बक्षीस पटकाविले. पंच म्हणून रुद्राप्पा हेडोरी, जयवंत खानापूरकर, यल्लाप्पा पाटील, रमेश दुस्की, मारुती पाटील, महादेव पाटील, वसंत गुरव आदींनी काम पाहिले. निवेदन शिवकुमार माळी, आप्पाजी पाटील व कृष्णाजी पाटील यांनी केले. यावेळी परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, अंजली पाटील, महांतेश वाली आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.









