वृत्तसंस्था/ पाटणा (बिहार)
2025 च्या इंडियन खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला ऑलिम्पिक धावपटू किरण पहलने 400 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये महिलांच्या 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत नंदीनी गुप्ताने सुवर्णपदक घेतले. तर पुरुषांच्या विभागात शिवमने सुवर्णपदक या क्रीडा प्रकारात मिळविले.
पुरुषांच्या थाळीफेकमध्ये रोहितकुमारने 51.56 मी. ची नोंद करत सुवर्ण, दीपक यादवने रौप्य आणि आशिषकुमारने कांस्यपदक घेतले. महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत शिवकन्या मुक्तीने 24.30 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. पुरुषांच्या तिहेरी उडीतील सुवर्णपदक पुनीतकुमारने मिळविताना 15.64 मी. ची नोंद केली. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत शताक्षी रायने 12.04 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. विधीने महिलांच्या गोळाफेकीत सुवर्णपदक मिळविताना 15.34 मी. ची नोंद केली.









