राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप : 50 मी. 3 पी प्रकारात मिळविले यश
वृत्तसंस्था/भोपाळ
भारतीय नौदलाच्या किरण अंकुश जाधवने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्या स्वप्निल कुसाळेचा तर आणखी एक ऑलिम्पियन ऐश्व़र्य प्रताप तोमर यांना मागे टाकत येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन्सचे जेतेपद पटकावले. जाधवने अंतिम फेरीत 465..8 गुण घेत ऐश्वर्य प्रतापवर (463.1) मात केली. येथील एमपी स्टेट अॅकॅडमी शूटिंग रेंजवर ही स्पर्धा सुरू आहे. अंतिम फेरीतील 40 व्या शॉटपर्यंत स्वप्निल कुसाळे आघाडीवर होता. पण नंतर त्याची घसरण झाली आणि 451.8 गुणांसह त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी झालेल्या पात्रता फेरीत स्वप्निलने 593 गुण नोंदवत पहिले स्थान मिळविले होते. ऐश्वर्यने 592 मिळविले तर जाधवने 590 गुणांसह चौथे स्थान घेतले होते. अंतिम फेरीच्या प्रत्येक टप्प्यावर आघाडीवर राहणाऱ्या स्वप्निलने 40 व्या शॉटनंतर
एकदाही 10 गुण मिळविता आले नाहीत. स्टँडिंग पोझिशनमधील शेवटच्या चार शॉट्समध्ये त्याने 9.2, 9.4, 8.9, 9.5 असे गुण नोंदवल्याने सुवर्णपदकाच्या त्याच्या आशा संपुष्टात आल्या. 40 व्या शॉटपर्यंत जाधव तिसऱ्या स्थानावर होता. पण नंतर त्याने 10.6, 10.4, 10.6, 10.0, 10.8 गुण घेत सुवर्णपदक पटकावले. ऐश्वर्यने 41 व्या शॉटला 9.9 गुण घेतले. पण स्वप्निलच्या घसरणीचा त्याला फायदा उठवता आला नाही. कनिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत पश्चिम बंगालच्या अॅड्रियन करमाकरने मध्यप्रदेशच्या कुशाग्र सिंग राजावतला मागे टाकत सुवर्ण पटकावले. त्याने 462.0 गुण नोंदवले तर राजावतने 458 गुण घेत रौप्य मिळविले. राजस्थानच्या दीपेन्द्र सिंग शेखावतने 445.6 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. पात्रता फेरीत अॅड्रियनने 586 गुण घेत तिसरे स्थान मिळविले होते तर हरियाणाच्या रोहित कनयानने 587 गुण घेत अव्वल स्थान घेतले होते.









