‘प्राईड ऑफ कर्नाटका’ पुरस्कार प्रदान
बेळगाव : बेळगावचे नवोदित तरुण उद्योजक व ‘किरण एअरकॉन’चे मालक तसेच ‘ब्ल्यू स्टार’ कंपनीचे अधिकृत वितरक किरण इनामदार यांना उद्योजकतेमध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल यावर्षीच्या ‘प्राईड ऑफ कर्नाटका’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बेंगळूरच्या यशवंतपूरमधील आर. जी. रॉयल पॅलेसमध्ये शानदार समारंभात चित्रपट दिग्दर्शक सुनीलकुमार देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी विजयानंद काश्यप्पनवर उपस्थित होते. विक्री आणि सेवा क्षेत्रात या वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट डिलर’ असा बहुमान त्यांना देण्यात आला. किरण इनामदार यांनी 20 वर्षांपूर्वी ब्ल्यू स्टार या एसी उपकरणाची डिलरशीप घेतली. त्यांनी कर्नाटक, गोवा व पश्चिम महाराष्ट्र येथेही सेवा दिली. या माध्यमातून 25 हून अधिक जणांना रोजगार मिळवून दिला. कंत्राटी पद्धतीवरही कोल्हापूर, पुणे, बागलकोट, विजापूर, गोवा, खानापूर येथे त्यांचे काम सुरू आहे. बेळगावमधील नामांकित हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापने, निवासी संकुल, डी-मार्ट, लेकव्ह्यूसह मोठी हॉस्पिटल्स, पोतदार, कल्याण ज्वेलर्स, रेणुका शुगर्स, बेलगाम शुगर्स, हेमरस शुगर्स, जीआयटीसह महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था यांसह सर्वत्र ब्ल्यू स्टारच्या माध्यमातून त्यांची कामे सुरू आहेत.
या निवडीपूर्वी प्रत्येक उद्योजकाची मुलाखत घेण्यात आली. यामध्ये 20 वर्षांपासून केलेल्या कामाची माहिती किरण इनामदार यांनी दिली. तुमचे पुढचे उपक्रम काय आहेत? या प्रश्नावर तरुण बेरोजगारांसाठी ‘स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ सुरू करणार असून या माध्यमातून त्यांना स्वावलंबी केले जाईल, असे त्यांनी सांगितले. व्ही-गार्ड सोलारच्या सहकार्याने ‘के-टेक सोलार’ची फ्रँचायजी घेत असून बेळगावमध्ये ‘के-टेक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ व गोवा येथे नवीन एसी व सोलारची शोरुम्स सुरू करत आहोत, असे सांगितले. बेंगळूरनंतर प्रथमच बेळगावला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आपल्या व्यवसायामध्ये पत्नी सहना हिचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे किरण यांनी नमूद केले. ते रोटरी सदस्य असून सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा व गणपतराव उर्फ सुभाष इनामदार यांचे किरण हे सुपुत्र आहेत.









