वृत्तसंस्था /बँकॉक
भारताचा युवा बॅडमिंटनपटू किरण जॉर्जने आपला विजयी सिलसिला कायम ठेवताना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. किरणने चीनच्या जागतिक क्रमवारीत 26 व्या स्थानावरील वेंग यांगला पराभूत करण्याची किमया केली. याशिवाय, अन्य लढतीत सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत तसेच पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात किरण जॉर्जने चीनच्या वेंगचा 21-11, 21-19 असे पराभूत केले. ही लढत 39 मिनिटे चालली. विशेष म्हणजे, या विजयासह जागतिक क्रमवारीत 59 व्या स्थानावर असणाऱ्या किरणने प्रथमच वर्ल्ड टूर स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता, त्याची पुढील लढत फ्रान्सच्या ज्युनियर पोपोव्हशी होईल. दरम्यान, किरणने सलामीच्या सामन्यात देखील चीनचा दिग्गज खेळाडू शी युकीला पराभवाचा धक्का दिला होता. यानंतर आजच्या सामन्यात देखील त्याने आक्रमक खेळाचे प्रदर्शन साकारताना चीनच्या वेंगला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. किरणने पहिला गेम 21-11 असा सहज जिंकला. पण दुसऱ्या गेममध्ये मात्र त्याला प्रतिस्पर्धी वेंगने चांगलीच टक्कर दिली. एकवेळ दोघांत 16-16, 19-19 अशी बरोबरी होती पण मोक्याच्या क्षणी किरणने दोन गुणाची कमाई करत हा गेम 21-19 असा जिंकला व उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुष गटातील अन्य लढतीत लक्ष्य सेनने चीनच्या शी फेंग लीचा 21-17, 21-15 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. लक्ष्यने या सामन्यात नेटजवळ सुरेख खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी फेंगला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. यामुळे दोन्ही गेममध्ये त्याने वर्चस्व गाजवत विजयाला गवसणी घातली. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना मलेशियाच्या जून लिआंगशी होईल.
सायना, अश्मिता स्पर्धेबाहेर
महिला एकेरीतील लढतीत स्पेनची दिग्गज खेळाडू व रिओ ऑलिम्पिक सुवर्णविजेती कॅरोलिन मारीनने भारताच्या अश्मिताला 21-18, 21-13 असे सहज पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय, अन्य एका लढतीत सायना नेहवालने आपली पराभवाची मालिका कायम ठेवली. या स्पर्धेत तिला दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या ही बिंगजाओने तिला 21-11, 21-14 असे नमवले. तर सिंधू पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने महिला एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग जोडी पराभूत
भारताच्या अव्वलमानांकित सात्विकसाईराज-चिराग यांना देखील दुसऱ्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय जोडीला प्रतिस्पर्धी फिक्री-मौलाना जोडीने 26-24, 11-21, 17-21 असे हरवले.









