हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे किन्नौर कैलास यात्रा तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. यात्रा मार्गावर अडकलेल्या 413 भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. पावसामुळे टांगलिप्पी आणि कांगरांग येथील दोन तात्पुरते पूल वाहून गेल्यामुळे भाविक अडकल्याचे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. किन्नौर जिल्हा प्रशासनाला अडकलेल्या भाविकांची माहिती मिळताच आयटीबीपी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकांनी बचावकार्य सुरू केले. आयटीबीपीने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मदतकार्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये भाविक झिपलाइनच्या मदतीने नाले ओलांडताना दिसत आहेत. सततच्या पावसामुळे यात्रा मार्गावर मोठे नुकसान झाले आहे. ट्रेकिंग मार्ग अत्यंत निसरडे होण्यासोबतच अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेत किन्नौर कैलास यात्रा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या यात्रामार्गावर असलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.









