मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केले वांगचुक यांचे स्वागत
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे 8 दिवसीय दौऱ्याअंतर्गत भारतात पोहोचले आहेत. गुवाहाटी येथे भूतानच्या राजांचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी स्वागत केले आहे. वांगचूक हे 3 ते 10 नोव्हेंबरपर्यंत भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत.

भूतानच्या राजांसोबत तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ देखील दौऱ्यावर आले आहे. आसामच्या जनतेकडून भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे स्वागत करण्यासाठी उत्साहित आहे. आमच्या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तम संबंध निर्माण करण्यासाठी तत्पर आहोत असे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी नमूद केले आहे. या दौऱ्यादरम्यान भूतानचे राजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. याचबरोबर विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याशी ते चर्चा करतील अशी माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्राचाही दौरा करणार
भूतानचे राजे हे महाराष्ट्राचाही दौरा करणार आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात भूतानच्या राजांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. त्या दौऱ्यावेळी द सीमेवर पहिली एकीकृत तपास चौकी (आयसीपी) स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.









