मंगाई यात्रेपूर्वी डागडुजी करण्याची मागणी
बेळगाव : वडगावमधील अंतर्गत रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी खोदाई केल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्ते चिखलमय बनले असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वडगावची ग्रामदैवत मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. 11 रोजी होणार असून त्यापूर्वी तरी रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वडगावमधील धामणे रोड, यरमाळ रोड, संभाजीनगर, विष्णू गल्ली, विठ्ठलदेव गल्ली या परिसरात काही महिन्यांपूर्वी वाहिन्या घालण्यासाठी खोदाई केली होती. खोदाईनंतर एलअॅण्डटी कंपनीने संबंधित ख•s व चरी बुजविणे गरजेचे होते. परंतु कंपनीने साफ दुर्लक्ष केल्याने रस्त्यांवरुन येणे-जाणे धोकादायक ठरत आहे. दुचाकी चालक चिखलातून ये-जा करताना अपघात होत असून अनेक जण जायबंदी झाले आहेत. विद्यार्थ्यांनाही शाळेला ये-जा कठीण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा मागणी करूनही मनपा तसेच एलअॅण्डटी कंपनीकडून समर्पक उत्तरे दिली जात नसल्यामुळे दाद मागायची तरी कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्री चिखलातून वाहने घसरली जात असून यावर वेळीच तोडगा काढणे गरजेचे आहे.
भाविकांची गैरसोय टाळा
शहर व परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मंगाई देवीची यात्रा ओळखली जाते. त्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये त्याकरिता यात्रेपूर्वी ठिकठिकाणी पडलेले ख•s बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.









