त्वरित या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
हिंडलगा : आंबेवाडी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गावातील शांतीनगर परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. काँक्रीटीकरण न झाल्याने रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारक आणि रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पंचायतीच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी त्वरित या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या शांतीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. पण गेल्या काही वर्षापासून या ठिकाणचे रस्ते आणि गटारींच्या विकासकामाकडे ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधीनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याचा नाहक त्रास मात्र परिसरातील रहिवासी व वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले नसल्याने उन्हाळ्यात धूळ तर पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागत आहे. सध्या परिसरातील सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली असून चिखलातून वाट काढताना ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याबाबत रहिवाशांनी अनेकदा ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधीकडे तक्रार करूनदेखील अद्याप कोणीच दखल घेतली नाही. गेल्या पाच वर्षापासून काही नागरिक रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याच्या मागणीसाठी पंचायतीकडे पाठपुरावा करीत आहेत. तरीदेखील पंचायतीकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यामुळे पंचायतीच्या या दुर्लक्षाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत असून, त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करून रहिवाशांचे हाल थांबवावेत.









