कराड :
‘किंग ऑफ कराड’ अशी सोशल मिडियावर एकाने पोस्ट केल्यानंतर त्यावर दुसऱ्याने कमेंट केली. यावरून शुक्रवारी झालेल्या वादात एकास बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील बारची तोडफोड जमावाने केली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून शुक्रवारी रात्री उशिरा परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या. या फिर्यादीवरून दोन्ही गटातील 16 जणांवर गुन्हा दाखल झाला असून आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोशल मिडियावर झालेल्या वर्चस्ववादातून मारहाण, दगडफेक झाली. या गुन्ह्यातील संशयितांची रात्री उशिरापर्यंत धरपकड सुरू होती. दरम्यान, मुस्कान आमिन कोकणे (वय 32 रा. खराडे कॉलनी, कराड) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
- वाद मिटला पण पुन्हा चिघळला
कोकणे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, 6 जानेवारी 2025 रोजी त्यांचा अल्पवयीन मुलगा रात्री उशिरा घरी आला. त्याच्यासमवेत आलेल्या या मित्राने त्यांना तुमच्या मुलाने सोशल मिडियावर पाठवलेल्या मेसेजवरून त्याचा कराडच्या मंडईतील मुलांशी भांडण झाल्याचे सांगितले. मुलाला मंडईतील मुले मारहाण करणार आहेत असे त्याच्या आईला मुलाच्या मित्राने सांगितले. यासंदर्भात मुलाला त्याच्या कुटूंबियांनी विचारणा केली असता त्याने सोशल मिडियावर आलेल्या पोस्टवर मी एक कमेंट केली. यावरून वाद झाला मात्र आता तो मिटला असून त्यांचा गैरसमज दूर झाला असल्याचे त्याने सांगितले.
- मिटलेला वाद उफाळून आला
6 जानेवारी रोजी मिटलेला वाद 7 जानेवारीला पुन्हा उफाळून आला. कोकणे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे मुलाला मारहाण होईल या भितीने कुटूंबियांनी त्याला बाहेर जाऊ नकोस असे बजावले होते. मात्र तो घरातून बाहेर गेला. यानंतर 1.15 वाजता फिर्यादी मुस्कान कोकणे यांच्या मोबाईलवर फोन आला की, त्यांच्या अल्पवयीन मुलास चार संशयितांनी काठी, फर्शीने मारहाण केली असून तो गंभीर जखमी आहे. त्याच्या दोन्ही पायावर, हातावर दुखापत झाली आहे. त्याला मुळीक पेट्रोलपंपाजवळ टाकून संशयित पसार झाले आहेत. मुलाला जखमी अवस्थेत उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोकणे यांच्या मुलाने वादग्रस्त पोस्ट केल्याच्या गैरसमजातून त्याला मारहाण झाल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.
- दगडफेक करून सरकार बारचे नुकसान
कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीला परस्पर विरोधी फिर्याद प्रितम राजाराम शिंदे (वय 35 रा. विरवडे ता. कराड) यांनी दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, कोल्हापूर नाक्यावरील सरकार बिअर बारसह अन्य एका बारचे व्यवस्थापन ते पाहतात. 7 जानेवारी 2025 रोजी नेहमीप्रमाणे बार उघडला होता. व्यवस्थापक कामानिमित्त दुपारी बाहेर गेले. दुपारी 3.45 च्या सुमारास 15 मुलांनी दुकानासमोर येत आरडाओरडा करून अचानक दगडफेक सुरू केली. दगडफेकीत बारचे मोठे नुकसान झाले.
- दुकान कसे चालवते ते बघतो?
सरकार बारवर दगडफेक करणाऱ्या संशयितांनी बारमधील मॅनेजर यांना धमकी दिली. तु कसे दुकान चालवतो. तुझे दुकानच बंद करतो असे म्हणत शिविगाळ करून दगडफेकीला सुरूवात केल्याचे शिंदे यांच्या फिर्यादीत आहे. दगडफेक करणारांनी बारच्या एलईडी बोर्ड, काऊंटर, शटरच्या साईड पॅनेलची तोडफोड केली. दगडफेकीनंतर संशयित तेथून गायब झाले. घटनास्थळी दगड पडलेले होते. फिर्यादी प्रितम शिंदे यांनी शेजारील सीसीटीव्ही तपासले असता 13 ते 15 जण बारवर दगडफेक करत असल्याचे त्यात दिसून आले.
- अल्पवयीन मुलांचा समावेश धक्कादायक
सोशल मिडियावर वर्चस्ववादातून झालेल्या या गुन्ह्यात काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ज्याला मारहाण झाली तो सुद्धा अल्पवयीन असून मारहाण करणारांपैकी काहीजण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलांच्यातही हा वर्चस्ववाद पेरला जात असून त्यांना गुन्हेगारीचे आकर्षण कारणीभूत ठरत असल्याची चिंता पोलिसांनी व्यक्त केली.








