पंतप्रधानांच्या चीनविषयक वक्तव्यामुळे वाद ः
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनसोबत सीमा वाद आणि भूतानच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर तेथील राजे भारताच्या दौऱयावर येत आहेत. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक हे सोमवारपासून तीन दिवसीय दौऱयावर असणार आहेत. या दौऱयादरम्यान द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी ते विविध नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. यात विशेषकरून आर्थिक आणि विकास सहकार्यासंबंधी चर्चा होणार आहे. वांगचूक यांच्यासोबत भूतानचे विदेशमंत्री टँडी दोरजी आणि अन्य वरिष्ठ मंत्रीही भारतात येणार आहेत.
भूतानचे राजे जिग्मेस खेसर नामग्याल वांगचूक हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणानुसार भारतात येत आहेत. या दौऱयात वांगचूक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतील. भूतानचे राजे वांगचूक यांचा दौरा दीर्घकाळापासून उच्चस्तरीय आदान-प्रदानच्या परंपरेंतर्गत होत आहे. भारत आणि भूतान हे घनिष्ठ मित्र देश असल्याचे उद्गार विदेश मंत्रालयाने काढले आहेत.
भूतानच्या पंतप्रधानांची टिप्पणी
डोकलाम वादावर तोडगा काढण्यासाठी चीनची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच चीनकडून भूतानमध्ये कुठल्याही प्रकारची घुसखोरी करण्यात आली नसल्याचे वक्तव्य भूतानचे पंतप्रधान लोटे त्शेरिंग यांनी केले होते. त्शेरिंग यांचे हे वक्तव्य भारताच्या चिंता वाढविणारे आहे. डोकलाम वादानंतर चीनने तिन्ही देशांच्या सीमा एकत्र येणाऱया ठिकाणानजीक सैन्य सुविधा वाढविण्याचे सत्र आरंभिले आहे. तसेच चीनने भूतानच्या हद्दीत अन् डोकलाम पठारानजीक अनेक गावे वसविली असल्याचे आंतरराष्ट्रीय अहवालांमधून वारंवार निदर्शनास आले आहे.
जुन्या भूमिकेला छेद
भूतानमध्ये चिनी निर्मितीकार्यांसंबंधी मोठय़ा प्रमाणात माहिती प्रसारित होत आहे. परंतु हे निर्मितीकार्य भूतानमध्ये होत नसल्याने आम्ही चिंतेत नाही. ही एक आंतरराष्ट्रीय सीमा असून आमची हद्द कुठे आहे हे आम्ही जाणून आहोत. चीनसोबतच्या सीमेवरील समस्या मोठी नाही. परंतु काही क्षेत्रांमध्ये अद्याप सीमांकन झालेले नाही. एक किंवा दोन बैठकांनंतर आम्ही सीमा निश्चित करण्यास सक्षम होऊ असे उद्गार भूतानच्या पंतप्रधानांनी काढले होते. त्यांनी एकप्रकारे भूतानच्या जुन्या भूमिकेला छेद देत चीनकडून घुसखोरी झाली नसल्याचा दावा केला आहे.









