भारत व वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसरा कसोटी सामना विराट कोहली याच्यासाठी खूपच खास आहे. विराटचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 500 वा सामना आहे. याच सामन्यात विराटने पहिल्या डावात नाबाद 87 धावांची खेळी साकारत खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे. या विक्रमासह तो अशी कामगिरी करणारा जगातील पाचव्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.
विराटने पहिल्या डावात फलंदाजी करताना पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 161 चेंडूत नाबाद 87 धावा केल्या. या धावा करताच विराटच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली 25,548 धावा करण्यात यशस्वी झाला. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज बनला. यावेळी त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिसला मागे टाकले. कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 25534 धावा केल्या होत्या. आता विराटने पछाडल्याने तो सहाव्या स्थानी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर आहे. सचिनने कारकीर्दीत एकूण 34,357 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
- 34,357 – सचिन तेंडुलकर
- 28,016 – कुमार संगकारा
- 27,483 – रिकी पाँटिंग
- 25,957 – महेला जयवर्धने
- 25,548 – विराट कोहली
- 25,534 – जॅक कॅलिस
- 24,208 – राहुल द्रविड.









