प्रतिनिधी /कुंभारजुवे
आखाडा येथील सुमारे पन्नास वर्षापूर्वीच्या सरकारी मिडल स्कूलची व सध्या बालवाडी भरत असलेल्या इमारतीचे छप्पर व इमारत धोकादायक स्थितीत आहे. सध्या पडणाऱया मुसळधार पावसात खराब झालेल्या छप्परातुन पाणी भिंतीवर पडत आहे. त्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने आखाडा वासीयांत संतापाची लाट पसरली आहे.
या बालवाडीच्या इमारतीत पुर्वी इ. 5 वी ते इ. 7 वी पर्यंतचे मराठी मिडियमचे हायस्कूल होते. त्यामुळे इथली मुलें शिक्षणां?पासुन वंचित राहीली नाही. मिडल स्कूल बंद झाल्यावर या इथे प्राथमिक शाळा भरु लागली तदनंतर शाळेला नवीन इमारत उपलब्ध झाल्याने तिथे बालवाडी भरायला सुरू झाली.
सदर इमारत खुप जुनी असल्याने, व त्याचे छप्पर खराब झाल्याने शिक्षण खात्याकडून सदर इमारत दुरुस्तीसाठी खाली करण्याचे आदेश मार्च, 22 मध्ये करण्यात आल्याने बालवाडी नवीन इमारतीत हलविण्यात आली आहे. मार्च ते जुन, 22 पर्यंत कुणीच या इथे दुरुस्तीसाठी फिरकले नाही, असे पालकांनी सांगितले.
याच बालवाडी साठी दोन वर्षांपूर्वी दोन शौचालय बांधलेली आहेत त्याचे काम अपूर्णावस्थेत असून ती शौचालय शोभेची वस्तू झालेली आहेत. मात्र या शौचालयांना कुलुपे लावलेली आहेत. या भागाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून या इमारतीचे अडलेले दुरुस्तीचे काम मार्गी लावावे व विध्यार्थ्यांचा धोका दुर करावा अशी पालक व नागरिकांची आग्रही मागणी आहे.









