11 वर्षांची मुलं सुद्धा वापरतात डायपर
जर एखाद्या मुलाला मोबाइल कसा वापरावा हे माहित असेल तर टॉयलेट कसे वापरावे हे देखील माहित असणे अपेक्षित आहे. परंतु एका देशात 11 वर्षांच्या वयामध्येही मुले डायपर घालून शाळेत जात आहेत. या मुलांना टॉयलेट कसे वापरावे हेच माहित नाही. हा प्रकार स्वीत्झर्लंडमधील आहे. तेथील शाळेतील शिक्षकांनी बरेच विद्यार्थी वर्गात डायपर घालून येत असल्याची तक्रार केली आहे. मुलं साधारण वयाच्या 4 थ्या वर्षापासून शाळेत येण्यास सुरुवात करतात. पण कित्येक मुले अजूनही डायपरचा वापर करताना दिसून येतात. 11 वर्षांची मुले डायपर घालून शाळेत येत असतील तर नक्कीच चिंता करण्यासारखी बाब आहे. कित्येक मुलांना डायपर परिधान करण्याची इतकी सवय झालेली असते की ती जाणूनबुजून टॉयलेटचा वापर करत नाहीत किंवा त्यांना त्याचा कसा वापर करावा याचाच विसर पडतो. आईवडिल मुलांना स्वत: या गोष्टी शिकवत नाहीत. स्वीत्झर्लंडमध्ये प्रशिक्षण सत्र आयोजित होतात, परंतु पालक तेथे मुलांना घेऊन जात नसल्याचे स्वीस फेडरेशन ऑफ टीचर्सचे प्रमुख डॅगमार रोसलर यांनी सांगितले आहे.
कारण काय?
काही पालकांना मुलांनी डायपर परिधान करणे अधिक सोयीस्कर वाटते, परंतु आजच्या काळात ही मोठी समस्या नसली तरी यामुळे चुकीचा संदेश दिला जात असल्याचे शिक्षण वैज्ञानिक मार्गारिट स्टाम यांनी म्हटले आहे. डायपर घालून शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या स्वीत्झर्लंडमध्ये झपाट्याने वाढत आहे. एक 11 वर्षाचा मुलगा अलिकडेच आमच्याकडे आला, त्याला अद्याप शौचालयाचा कसा वापर करावा हेच माहित नव्हते. मुलांना यासंबंधी काहीच माहिती नसल्याने शिक्षक अडचणीत येतात, याबाबत शिक्षकांनी पालकांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली असल्याचे बालविकास तज्ञ रिटा मेस्मर यांनी सांगितले आहे.









