वार्ताहर/किणये
ज्ञानेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी किणये यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व सोसायटीचा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम किणये येथे झाला. अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन सुरेश डुकरे होते. सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. व्हा. चेअरमन मंगेश पाटील, नावगे शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रसाद सडेकर, उपाध्यक्ष नागाप्पा दरवेशी, जांबोटी शाखेचे अध्यक्ष भरमू गुरव, उपाध्यक्ष शिवाजी नाईक आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. चौराशीदेवी फोटो प्रतिमेचे पूजन चौराशीदेवी महिला सोसायटीच्या चेअरपर्सन वसुंधरा डुकरे व व्हा. चेअरपर्सन रेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सुरेश डुकरे यांनी केले. संस्थेला 42 लाख 22 हजार 302 रुपये इतका नफा झाला आहे.
सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. संस्थेच्यावतीने इतर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. सेक्रेटरी अनंत पाटील यांनी अहवाल, जमाखर्च, नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. संचालक रामलिंग गुरव यांनी अहवालाला सभासदांकडून मंजुरी घेतली. संचालक यशवंत गुरव यांनी 2025 ते 26 चे अंदाजपत्रक सादर केले. संस्थेच्यावतीने किणये ग्राम पंचायत, जांबोटी ग्राम पंचायत तसेच बैलूर, आमटे या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील दहावीच्या गुणी विद्यार्थ्यांचा तसेच पीयुसी द्वितीय वर्ष, पदवी, पदवीधर व इतर कोणत्याही शाखेमध्ये 80 टक्के हून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या खेळाडूंचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिक, शाखांचे सल्लागार, सभासद शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. डी. पाटील यांनी केले. यशवंत गुरव यांनी आभार मानले.









