वृत्तसंस्था / बीजिंग
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन सहा वर्षांनी मंगळवारी त्यांच्या बुलेट ट्रेनने चीनला पोहोचले आहेत. या दौऱ्यादरम्यान ते बीजिंगला भेट देऊन तेथे आयोजित लष्करी परेडमध्ये भाग घेतील. लष्करी परेडमध्ये सहभागी होण्यासाठी किम जोंग उन त्यांच्या बुलेट ट्रेनने 20 तासांच्या प्रवासानंतर बीजिंगला पोहोचले आहेत. किम जोंग उन यांच्या या ऐतिहासिक ट्रेनला शाही सवारी म्हणतात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हेदेखील चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह या समारंभात सहभागी होतील. किम जोंग उन यांचा प्योंगयांग ते बीजिंग हा प्रवास अनेक प्रकारे खूप मनोरंजक आहे. 2023 नंतर हुकूमशहा किम जोंग उन यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. यापूर्वी 2023 मध्ये रशियाच्या दौऱ्यावर जात त्यांनी राष्ट्रपती पुतीन यांची भेट घेतली होती.









