सुधाकर काशीद,कोल्हापूर
Nag Panchami Special : साप हा आपला मित्र आहे.. तो उठसुठ दिसेल त्याला चावत नाही.. यामुळे साप वाचवला पाहिजे, हे म्हणायला ठीक असले तरी ज्याच्या घरी साप येतो, त्याची उडालेली फजिती खूप वेगळी असते आणि घरातून सापाला बाहेर काढण्यासाठी त्याची वाटेल तशी धावपळ सुरू असते. एक तर साप आपोआप बाहेर गेला तरी त्याची धास्ती त्याच्या मनात राहतेच किंवा मग साप मारणे हा मार्ग अवलंबला जाण्याची शक्यता जास्त असते. पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. त्याला कारण सर्पमित्र हा घटक ठरला आहे.
दिसला साप की त्याला ठेचायचा, हा प्रकार बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे आणि सापाला पकडण्यासाठी, त्याला पुन्हा सुरक्षितस्थळी सोडण्यासाठी सर्पमित्रांचा आधार महत्त्वाचा ठरला आहे. कोल्हापूरचा विचार केला तर ‘स्नेक फ्रेंड्स्’ संकल्पनेने कोल्हापुरात चांगलेच मूळ धरले आहे. साप आल्याची वर्दी येताच हातातील काम सोडून धावणे, ज्या जागी साप त्याच्या सुरक्षिततेसाठी दडला आहे तेथून त्याला शोधणे. हे करताना वळचणीत जाऊन जीवालाही धोका पत्करणे पण सापाला सुरक्षित पकडून त्याला सोडून देणे हे काम सर्पमित्र करतात.
कोल्हापूर विकसित होत असले तरीही कोल्हापुरातील जुन्या पेठांत अजूनही सापांचा वावर आहे. दगड, विटा, विटा पांढऱ्या मातीच्या भिंती, कौले, बांबू पोटमाळे, मोकळ्या जागा, गोठे, गटार यामुळे तेथे सापांचे अस्तित्व आहे. जेथे नवीन उपनगरे होत आहेत. तेथील झाडेझुडपे, दलदल, दगड, विटा-मातीचे थर यामुळे त्या भागातील सापांचे अस्तित्व आहे. शहराच्या चारही बाजूला साधारण सहा ते सात किलोमीटरवर शेतीचा भाग आजही कायम आहे. त्यामुळे सर्पमित्रांना दोन-तीन दिवसांतून एकदा तरी साप आला आहे. ‘तातडीने या’ असे फोन रात्री अपरात्री येणार, हे ठरलेलेच आहे.
कोल्हापूर परिसरात नाग, मण्यार, घोणस साप विशेष करून उपनगरी परिसरात आहेत. जुन्या कोल्हापुरात धामण, टस्कर, धुळ नागीन, येरुळा, नाणेटी, गवत्या साप आहेत. वास्तविक वाढत्या नागरीकरणात साप कमी व्हायला पाहिजे होते. पण तेही कमी अधिक प्रमाणात त्या त्या परिसरातील परिस्थितीनुसार कायम आहे. पण एक झाले आहे की, ‘दिसला साप की त्याला ठेच..’ हे प्रमाण नक्की कमी झाले आहे. साप आपला मित्र आहे, ही भावना बऱ्याच प्रमाणात रुजली आहे आणि सर्पमित्र हे त्या मागचे एक कारण ठरले आहे.
सेवा म्हणून काम…
साप पकडण्याची सुविधा असलेली एक काठी, प्लास्टिकचा मोठा नळा, एखादे पोते, काचेची बरणी या आधारे सर्पमित्र सापांना पकडतात. त्याला सुरक्षित सोडतात. साप आला की या सर्पमित्रांची लोकांना आठवण येते. मग यांना फोनवर फोन करायला सुरुवात होते. हे लोक एक सेवा म्हणून हे काम करतात, ही जाणीव न ठेवता, त्यांना ताबडतोब या.. इतका का वेळ? अशी दमबाजीही सहन करावी लागते. ‘सर्पमित्र’ नावाखाली काही अपप्रवृतीही काही ठिकाणी तयार होत आहेत.
मुलीही सर्पमित्र..
सर्पमित्र म्हणून श्वेता सुतार ,ऐश्वर्या मुनिश्वर, स्नेहल जाधव, कविता बकरे या मुलीही काम करतात. नुसता साप म्हटलं तरी सुरुवातीला घाबरणाऱ्या या मुली सापाबद्दल म्हणजे निसर्गातल्या या घटकाबद्दल त्यांना आस्था असल्याने त्या सर्पमित्र बनून गेल्या. साप आल्यास कुठेही बोलवा, एका पायावरच त्या तयार असतात. साप पकडतात. तेथे प्रेक्षक म्हणून जमलेल्या लोकांना त्या सापाची सर्व शास्त्राrय माहिती देतात, प्रबोधन करतात.
साप मारण्यापूर्वी पोहोचतो….
सर्पमित्र एकमेकांच्या कायम संपर्कात असतात. एखाद्याला फोन आला तर साप आलेल्या परिसरात जो सर्पमित्र राहतो त्याला ते त्याची माहिती देतात. साप कोणीतरी मारण्यापूर्वी आमची तेथे पोहोचण्याची धडपड असते. साप पकडून तो सुरक्षित सोडला की त्याचे समाधान एक वेगळेच असते.
सर्पमित्र देवेंद्र भोसले, शोएब बोबडे, शाम नायर, ऐश्वर्या मुनिश्वर.