दुचाकीस्वारांनी सोसायटीत घुसून केला गोळीबार : 33 वर्षांपासून लाहोरमध्ये वास्तव्य
वृत्तसंस्था/ अमृतसर/लाहोर
खलिस्तान कमांडो फोर्स (केसीएफ) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख परमजीत सिंग पंजवाड याची शनिवारी लाहोरमध्ये हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी सनफ्लॉवर सोसायटीत घुसून गोळ्या झाडून त्याची हत्या केली. गोळीबारात पंजवाड याचा जागीच मृत्यू झाला. 1990 पासून तो पाकिस्तानात आश्र्रय घेत होता. तो मलिक सरदार सिंग या नावाने येथे राहत होता. शनिवारी सकाळी 6 वाजता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हल्ला केल्याची माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली.
परमजीत सिंग पंजवाड हा पंजाबमधील तरनतारन जिह्यातील झब्बाल पोलीस स्टेशन अंतर्गत पंजवाड गावचा रहिवासी होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2020 मध्ये जाहीर केलेल्या 9 दहशतवाद्यांच्या यादीत परमजीत सिंग पंजवाड याचे नाव आठव्या क्रमांकावर होते. या यादीत त्याच्याशिवाय बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) प्रमुख वाधवासिंग बब्बर याचेही नाव होते. तो तरनतारनमधील दासुवाल गावचा रहिवासी आहे.
परमजीत सिंग पंजवाड ड्रोनद्वारे पाकिस्तानातून पंजाबमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता. या बेकायदेशीर मार्गाने मिळालेल्या पैशातून त्याने खलिस्तान कमांडो फोर्स सक्रीय ठेवली. परमजीत 1986 मध्ये पंजाबमधील दहशतवादाच्या वेळी त्याचा चुलत भाऊ लाभसिंगसह खलिस्तान कमांडो फोर्समध्ये सामील झाला होता. त्यापूर्वी तो पंजाबमधील सोहल येथील सहकारी बँकेत काम करत होता. भारतीय सुरक्षा दलांच्या हातून लाभसिंगचा खात्मा केल्यानंतर, पंजवाडने 1990 च्या दशकात ‘केसीएफ’ची कमान हाती घेत पाकिस्तानात आश्र्रय घेतला. पाकिस्तान सरकार पंजवाड आपल्या देशात असल्याचा इन्कार करत होता. पंजाब पोलिसांकडे परमजीतसिंगचे नाव मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत असताना 33 वर्षे पाकिस्तानात बसलेल्याचा कोणताही ताजा फोटो नाही. पोलिसांकडे त्याचे 35 वर्षे जुने फोटो असून ते घरातून जप्त करण्यात आले होते. सध्या परमजीत पंजवाडची पत्नी आणि मुले जर्मनीत राहत असल्याचे समजते.
ऑक्टोबर 2020 मध्ये शौर्यचक्र विजेते बलविंदरसिंग संधू यांची पंजाबमधील तरनतारन येथे हत्या करण्यात आली. या हत्येमागे परमजीतसिंग पंजवाड याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. बलविंदरसिंग संधू यांनी पंजाबमध्ये दहशतवादाविऊद्ध लढा दिल्यामुळे त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. तेव्हापासून पंजवाड हा बलविंदर सिंगच्या हत्येचा कट रचत होता.
खलिस्तान चळवळीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न
परमजीतसिंग पंजवाड हा बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) प्रमुख वधवासिंग आणि पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेले भारतीय शीख युवा महासंघाचे प्रमुख लखबीरसिंग रोडे यांच्यासह पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ आणि दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालत होता. त्यासाठीच तो पंजाबमध्ये सातत्याने शस्त्रे आणि ड्रग्ज पाठवत होता. केंद्रीय गृह मंत्रालयापासून आयबी आणि पंजाब पोलीस काउंटर इंटेलिजन्स टीम त्यांचे नेटवर्क तोडण्यात गुंतलेली असली तरी त्यांना पूर्णपणे यश आलेले नाही.









