डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार : अनगोळच्या शिवारात आढळला मृतदेह
बेळगाव : अनगोळ शेतवडीतील घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. व इतर.
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर, ता. बेळगाव येथील एका सेंट्रिंग कामगाराचा खून करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी नाथ पै नगर, अनगोळजवळील काळा तलावानजीक असलेल्या शेतवडीत त्याचा मृतदेह आढळून आला. तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
संजय तुकाराम पाटील (वय 35) रा. परमेश्वरनगर-येळ्ळूर असे खून झालेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. हा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. टिळकवाडी पोलीस स्थानकात त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि. 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी, पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. ते ठरावीक अंतरापर्यंत जाऊन घुटमळले.
काळा तलावाजवळील राजेंद्र कल्लाप्पा पाटील यांच्या शेतजमिनीत गुरुवारी सकाळी संजयचा मृतदेह आढळून आला. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह शेतात पडला होता. जवळच एक नवीन बांधकाम सुरू आहे. बांधकामावरील वॉचमनने मृतदेह पाहून आपल्या मालकांना ही माहिती दिली. त्यानंतर टिळकवाडी पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली.
सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. काही कामगारांनी हा मृतदेह येळ्ळूरच्या सेंट्रिंग कामगाराचा असल्याचे सांगून मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर त्याच्या वडिलांना माहिती देण्यात आली. तोपर्यंत वडील बळवंत पाटील हे कामावर गेले होते. तेही गवंडी काम करतात. मुलाच्या खुनाची माहिती समजताच ते कामावरून घटनास्थळी दाखल झाले.

संजय बुधवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. रात्री 7.45 ते गुरुवारी सकाळी 6.30 यावेळेत ही घटना घडली असून टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. रात्री सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









