तीन सशस्त्र हल्लेखोरांनी घरातून केले अपहरण, डोक्यात गोळीबार
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये पूर्व इंफाळ जिल्ह्यातील खुनिंगथेक गावात रविवार, 17 सप्टेंबर रोजी एका लष्करी जवानाच्या हत्येची घटना उघड झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तीन सशस्त्र हल्लेखोरांनी सुटीवर असलेल्या एका जवानाचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याच्या डोक्मयात गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली. रविवारी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर सदर जवानाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. मृत जवानाच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. कुटुंबियांच्या इच्छेनुसार जवानाचे अंतिम संस्कार केले जातील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लष्करानेही कुटुंबाच्या मदतीसाठी एक पथक पाठवले आहे.
कांगपोकपी जिल्ह्यातील लिमाखोंग येथे तैनात लष्कराच्या संरक्षण सुरक्षा कॉर्प्स प्लाटूनचा जवान सेर्टो थांगथांग कोम याच्याबाबतीत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. तो पश्चिम इंफाळमधील तऊंग येथील रहिवासी होता. शनिवारी त्याचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणाच्या घटनेवेळी जवानाचा 10 वर्षांचा मुलगा तिथे उपस्थित होता. आपले वडील व्हरांड्यात काम करत असताना तीन शस्त्रधारी लोक आपल्या घरात घुसले. सशस्त्र लोकांनी जवानाच्या डोक्यात पिस्तुल ठेवले आणि त्याला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जबरदस्तीने ओढत नेल्याची माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिली होती. शनिवारी दिवसभर जवानाबाबत कोणताही थांगपत्ता लागला नव्हता. त्यानंतर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा मृतदेह इंफाळ पूर्वेकडील खुनिंगथेक गावात आढळून आला. त्याचा भाऊ आणि मेव्हण्याने ओळख पटवली असून सैनिकाच्या डोक्यात गोळी घातल्याचे निदर्शनास येत आहे.
मणिपूरमध्ये 3 मे पासून मैतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारात आतापर्यंत 175 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात 32 जण अजूनही बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे.









